Friday, July 12, 2024

वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या किरण मानेंनी केली त्यांच्या ऐतिहासिक चित्रपटाची घोषणा

मागील काही दिवसांपासून मराठी मनोरंजनविश्वात किरण माने प्रकरणाची जोरदार चर्चा सुरु आहे. किरण माने यांना ‘मुलगी झाली हो’ मालिकेतून काढल्यामुळे हा सगळा वाद सुरु झाला आहे. या संपूर्ण प्रकरणावर सर्वच बाजूने आरोप प्रत्यारोप होत आहे. यावर समाजमाध्यमांत जोरदार चर्चा देखील पाहायला मिळत आहे. या सर्व प्रकरणात पुन्हा एकदा किरण माने यांनी पुन्हा एकदा त्यांच्या सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यांनी त्यांच्या फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली असून त्या पोस्टमुळे सगळ्यांचे लक्ष त्यांच्याकडे वेधले गेले आहे.

अभिनेते किरण माने हे स्टार प्रवाह चॅनेलवरील ‘मुलगी झाली हो’ या मालिकेत प्रमुख भूमिका साकारत होते. मात्र किरण माने यांना या मालिकेतून तडकाफडकी काढण्यात आल्याने मोठा वादंग निर्माण झाला. यावर किरण माने यांच्या चाहत्यांनी चॅनेलविरोधात मोहिमही सुरु केली होती. त्यामुळे मालिकेच्या निर्मात्यांनी किरण माने यांची इतर कलाकारांशी तसेच सेटवरील असभ्य वर्तणुकीमूळे त्यांना काढून टाकल्याचे स्पष्टीकरण दिले होेते. मात्र किरण माने यांनी माझ्या राजकीय भूमिकेमुळे मला बाहेर काढल्याचा आरोप या चॅनेलवर केला होता. यामुळे हा वाद चांगलाच पेटला. मात्र आता किरण माने यांनी आणखी एक पोस्ट करत त्यांच्या आगामी ‘रावरंभा’ या चित्रपटाची घोषणा केली आहे.

किरण माने आपल्या अधिकृत फेसबुक अकाऊंटवरून ही पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये त्यांनी ““आनंद वो…निव्वळ आनंद… नविन भन्नाट जबराट नादखुळा भुमिका ! सोबत प्रतिभावानांची टीम !! आपण वास्तवात ज्या विचारधारेची ‘भुमिका’ घेत असतो…लढत असतो..त्याचवेळी मोठ्या पडद्यावरबी त्याच विचाराचा धागा असनारी ‘भुमिका’ मिळावी, यासारखं दूसरं समाधान नाय भावांनो !!! “शुटिंग सुरू झाल्यापासून फेसबुकवर किरण माने, न्यूज चॅनलवर किरण माने, पेपरमध्ये किरण माने, सेटवर आलं की समोर किरण माने आणि कॅमेरा लेन्समध्ये पाहिलं तरी किरण माने…” अशी चेष्टा करत पोट धरून हसनारे आनि त्याचवेळी सतत पाठीवर हात ठेवून बळ देनारे मराठीतले दिग्गज कॅमेरामन संजय जाधव.. सोबत अपूर्वा नेभळेकर,ओम भूतकर, संतोष जुवेकर, कुशल बद्रिके..”

“टीव्हीवर माझ्यावर खोटे आरोप होत असताना, “आम्हाला माहीतीये ओ सर तुम्ही खूप चांगले आहात.कुणी काहीही म्हणू दे.” असं बोलुन मला दिलासा देणारी माझी गांववाली मोनालीसा बागल… आर्ट डिरेक्टर वासू पाटील.. माझ्या मातीतला, अतिशय भला ‘माणूस’ असलेला दिग्दर्शक अनुप जगदाळे… प्रचंड मोठ्ठा तामझाम असलेला भव्यदिव्य सिनेमा निर्माण करत असताना खर्चाच्या बाबतीत कसलीही तडजोड न करनारे निर्माते शशिकांत पवार… प्रताप गंगावणेंसारखा सिद्धहस्त लेखक.. आनखी काय पायजे?…एक लै भारी किस्सा घडला परवा.. स्पाॅटबाॅय धावत-धावत व्हॅनिटीमध्ये आला… चेहर्‍यावर संताप दिसत होता.. “सर, फेसबुकवर एकानं तुमची टवाळी करत लिहीलंय.. ‘आता कसा बसलास घरी.. काम गेलं हातातनं.’ त्येच्यायला त्येच्या.. सर मला लै राग आलाय.. त्याला ओरडून सांगावं वाटतंय ‘आमचा सातारचा वाघ घरी बसनार्‍यातला नाय..’ तुमचा आत्ता शुटिंग करतानाचा फोटो टाकू का??” मी कसंतरी त्याला समजावलं की दुर्लक्ष कर.. काळ उत्तरं देतो सगळ्याची.. …बाजूला मी न्यायासाठी लढा देत असतानाच, दुसर्‍या बाजूला अशा व्यक्तीची भुमिका करत होतो ज्यानं परक्या व्यक्तीला न्याय मिळावा म्हनून स्वत:चा जीव दिला. मुहूर्त होऊन माझं पहिलं शेड्यूल नुकतंच संपलं… प्रतिक्षा पुढच्या शेड्यूलची.. तोपर्यन्त न्यायाची दूसरी लढाई सुरू.. या आठवड्यात अनेक अविस्मरणीय घटना घडल्या, त्यातलीच ही एक… धन्यवाद अनुप..खूप खूप मनापासून आभार !!!” असे त्यांनी यात म्हटले आहे.

तत्पूर्वी किरण माने आणि स्टार प्रवाह हा वाद सध्या चांगलाच गाजत आहे. मालिकेतील कलाकारांंनीही किरण माने यांच्या विरोधात भूमिका घेतल्याने हा वाद चांगलाच चिघळला असून, यात कलाकारांसोबत राजकीय नेत्यांनी देखील त्यांचे मत व्यक्त केले आहे.

 

हेही वाचा :

हे देखील वाचा