कन्नड चित्रपटाचा सुपरस्टार पुनीत राजकुमारचे शुक्रवारी (२९ ऑक्टोबर) हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्याच्या निधनाने मनोरंजन जगताला मोठा धक्का बसला आहे. त्याचे पार्थिव कांतीरवा स्टेडियममध्ये ठेवण्यात आले होते, जिथे चाहत्यांची मोठी गर्दी त्याच्या अंत्यदर्शनासाठी आली होती. स्टेडियममधील ही गर्दी हाताळण्यासाठी पोलिसही तैनात होते. आपल्या आवडता स्टार सोडून जाताना चाहत्यांच्या मनावर काय परिणाम झाला असेल, याची कल्पना ही गर्दी पाहून येत आहे.
पुनीतला त्याचे चाहते अप्पू म्हणून ओळखतात, त्याच्यावर रविवारी सकाळी बंगळुरू येथील कांतीरवा स्टुडिओमध्ये एका खाजगी समारंभात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्याचे अंत्यसंस्कार त्याच्या वडिलांच्या स्मारकाजवळ पूर्ण राजकीय सन्मानाने केले जातील. पुनीतचे पार्थिव सकाळी ६ ते ६.३० या वेळेत कांतीरवा स्टेडियम ते कांतीरवा स्टुडिओपर्यंत सार्वजनिक मिरवणुकीत नेण्यात येईल आणि सकाळी ११ वाजेपर्यंत अंत्यसंस्कार पूर्ण होतील.
चाहत्यांची वाढती गर्दी पाहून कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी शनिवारी अंत्यसंस्कार करणे योग्य होणार नाही, असे सांगितले. पुनीतच्या पार्थिवाला अंतिम श्रद्धांजली वाहण्यासाठी शनिवारी त्यांच्याकडे पूर्ण दिवस आहे, असे सांगत त्यांनी चाहत्यांचे सांत्वन केले. कांतीरवा स्टेडियमबाहेर हजारो-लाखो चाहत्यांची गर्दी पाहून मुख्यमंत्र्यांना हा निर्णय घ्यावा लागला.
बालकृष्ण, जूनियर एनटीआर देखील त्यांच्या आवडत्या स्टारला अंतिम निरोप देण्यासाठी पोहोचले. यादरम्यान पुनीतचा मृतदेह पाहून दोघेही रडले. यावेळी कांतीरवा स्टेडियमवर हजारो लोक जमले होते. आपल्या आवडत्या स्टारच्या शेवटच्या दर्शनासाठी प्रत्येकजण आतुर झाला होता. पुनीतच्या अंतिम दर्शनासाठी कर्नाटकचे राज्यपाल थावरचंद गेहलोत आणि मुख्यमंत्री बसवराज बोम्मईही पोहोचले.
राजकीय सन्मानाने करण्यात येणार अंत्यसंस्कार
कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी शुक्रवारी सांगितले की, अभिनेता पुनीत राजकुमारवर पूर्ण सरकारी सन्मानाने अंत्यसंस्कार केले जातील. दरम्यान, खबरदारीचा उपाय म्हणून बेंगळुरू पोलिसांनी शहरातील सर्व दारूची दुकाने दोन रात्री बंद ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी चोख गस्त आवश्यक असल्याचे पोलिसांनी सांगितले. अंत्यसंस्कारासाठी अमेरिकेत राहणारी त्याच्या मुलीची प्रतीक्षा आहे. ती भारतात पोहोचल्यानंतरच त्याला अंतिम निरोप देण्यात येईल.
व्यायामानंतर छातीत दुखणे झाले सुरू
मिळालेल्या माहितीनुसार, पुनीत दोन तास व्यायाम करत होता. त्यानंतर अचानक त्याच्या छातीत दुखू लागले आणि त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयात दाखल केल्यानंतर काही वेळातच त्याच्या मृत्यूची बातमी आली. पुनीतचे वडील राजकुमार यांचेही हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले होते.
अभिनेत्याचे डोळे केले दान
वडिलांप्रमाणेच पुनीतचेही डोळे दान करण्यात आले आहेत. पुनीतचे वडील आणि प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेते डॉ. राजकुमार यांनी स्वतः १९९४ मध्ये त्यांच्या संपूर्ण कुटुंबाचे डोळे दान करण्याचा निर्णय घेतला होता.
पंतप्रधानांनीही शोक केला व्यक्त
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही पुनीतच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. त्याचा एक फोटो त्यांनी ट्विटरवर शेअर केला आहे. या फोटोमध्ये पीएम मोदी आणि पुनीत राजकुमार हसताना दिसत आहेत. पुनीतचे हे जाण्याचे वय नाही, असे पीएम मोदी म्हणाले.
कन्नड उद्योगाचे मोठे नुकसान झाल्याचे म्हणाले चिरंजीवी
दक्षिण चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार चिरंजीवी यांनी पुनीत राजकुमार यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आणि म्हटले की, “कर्नाटकचा पॉवर स्टार अप्पू गमावणे हे कन्नड चित्रपट इंडस्ट्रीचे मोठे नुकसान आहे. ते आमच्या कुटुंबाच्या खूप जवळचे होते आणि त्यांच्याशी आमच्या अनेक आठवणी जोडलेल्या आहेत.” त्यांनी प्रचंड शोक व्यक्त केला आहे. पुनीत राजकुमाराच्या निधनामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-समोर आला मृत्यूच्या काही वेळापूर्वीचा व्हिडिओ, ‘केजीएफ’ स्टार यशसोबत थिरकाताना दिसला पुनीत राजकुमार










