गेल्या अनेक दिवसांपासून अभिनेता राजकुमार राव आणि पत्रलेखा या दोघांच्या लग्नाची चर्चा सुरू होती. चाहते या दोघांच्या लग्नाची वाट पाहात असतानाच या दोघांनीही चाहत्यांना एक सुखद बातमी दिला आहे. सोमवारी (१५ नोव्हेंबर) रोजी या दोघांनीही त्यांचा लग्नसोहळा उरकला आणि प्रेमाच्या नात्याला पती पत्नीचे नाते जोडले. (Actor Rajkummar Rao and Patralekha tied the knot)
चंदीगड येथे मोठ्या जल्लोषात त्यांचे लग्न पार पडले. यावेळी त्यांच्या लग्नाला दोघांचे कुटुंबीय आणि अन्य निकटवर्तीय व्यक्ती उपस्थित होत्या. लग्न झाल्यावर या दोघांनी देखील त्यांच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर लग्नाचे फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये दोघेही अगदी आनंदी आणि खूप सुंदर दिसत आहेत.
राजकुमार रावने हे फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “११ वर्षांपासून असलेलं प्रेम, मैत्री, रोमान्स आणि मस्ती या सर्वांसह आज मी एकदाचं लग्न केलं. माझी आत्मा, माझी सर्वात चांगली मैत्रीण, माझं कुटुंब… माझ्यासाठी आज मी तुझा पती आहे या व्यतिरिक्त दुसरा कोणताच मोठा आनंद नाही पत्रलेखा.”
तसेच पत्रलेखाने देखील तिच्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, “मी आज माझ्या प्रत्येक गोष्टी बरोबर लग्न केले आहे. माझा प्रेमी, माझं कुटुंब, माझी आत्मा आणि गेल्या ११ वर्षांपासून माझा सर्वात चांगला मित्र. तुझी पत्नी असणे या व्यतिरिक्त कोणतीच भावना माझ्यासाठी मोठी नाही.”
जंगलातील रिसॉर्टमध्ये केले लग्न….
राजकुमार आणि पत्रालेखाने चंदीगडमधील एका रिसॉर्टमध्ये लग्न केले आहे. चंदीगडमधील द ओबेरॉय सुखविलास स्पा रिसॉर्ट हे सर्वात आलिशान रिसॉर्ट आहे. तसेच हे रिसॉर्ट जंगलामध्ये ८०० एकर परिसरात पसरलेले आहे.
या दोघांच्या लग्नाचे सुंदर फोटो त्यांच्यासह प्रसिद्ध फोटोग्राफर जोसेफ राधिक याने देखील त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत. या फोटोग्राफरने या आधी देखील अनेक बॉलिवूड कलाकारांच्या लग्नाचे फोटो त्याच्या कॅमेऱ्यात टिपलेत. यामध्ये अनुष्का शर्मा – विराट कोहली, दीपिका पदुकोण – रणवीर सिंग, प्रियंका चोपडा – निक जोनस या कलाकारांच्या जोड्या शामिल आहेत.
पत्रालेखा ही देखील अभिनय क्षेत्रात कार्यरत आहे. तिचे पूर्ण नाव पत्रलेखा मिश्रा पॉल असे आहे. २०१४ मध्ये तिने ‘सिटीलाईट’ या चित्रपटामधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यामध्ये राजकुमार राव देखील मुख्य भूमिकेत होता. ‘सिटीलाईट’ या चित्रपटानंतर पत्रलेखा ‘लव गेम’, ‘नानू की जानू’ अशा काही निवडक चित्रपटांमध्ये झळकली.