Sunday, February 23, 2025
Home बॉलीवूड ‘कर्म से डकैत, धर्म से आजाद’, रणबीरच्या बहुप्रतिक्षित सिनेमाचा टिझर रिलीझ, पाहायला मिळाला दमदार लूक

‘कर्म से डकैत, धर्म से आजाद’, रणबीरच्या बहुप्रतिक्षित सिनेमाचा टिझर रिलीझ, पाहायला मिळाला दमदार लूक

यावर्षी एप्रिल महिन्यात अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट्ट लग्नाच्या बेडीत अडकले होते. यानंतर आपल्या कामाला प्राधान्य देत पुन्हा आपल्या कामावर परतले आहेत. दोघांचेही अनेक सिनेमे येऊ घातले आहेत. अशातच रणबीरच्या आगामी ‘शमशेरा’ या सिनेमाचा टिझर समोर आला आहे. या टिझरमध्ये रणबीरचा जबरदस्त लूक पाहायला मिळत आहे. रणबीर बऱ्याच काळापासून मोठ्या पडद्यापासून दूर होता. मात्र, आता तो या सिनेमातून पुन्हा एकदा चाहत्यांचे मनोरंजन करण्यासाठी पुन्हा सज्ज झाला आहे.

रणबीर कपूर (Ranbir Kapoor) याच्या ‘शमशेरा’ (Shamshera) सिनेमाचा टिझर समोर आल्यानंतर चाहत्यांची सिनेमाच्या प्रदर्शनासाठीची उत्सुकता चांगलीच वाढली आहे. विशेष म्हणजे, या टिझरमध्ये सुपरस्टार संजय दत्त (Sanjay Dutt) हादेखील दमदार भूमिकेत पाहायला मिळत आहे.

सिनेमाचा टिझर
रणबीर कपूरच्या ज्या सिनेमाची चाहते आतुरतेने वाट पाहत होते, त्याचा टिझर समोर आला आहे. ट्रेलर रिलीज होण्याच्या दोन दिवस आधी त्याचा टिझर आला आहे, जो पाहून चाहत्यांचे उत्सुक होणे साहजिक आहे. यावेळी रणबीर कपूर आपल्या भूमिकेसोबत प्रयोग करताना एक डाकू बनला असून हा लूकही त्याच्यावर चांगलाच दिसत आहे. टिझरमध्ये संजय दत्तची झलकही पाहायला मिळत आहे, ती पाहून असे दिसते की, तो भारतीय असूनही ब्रिटिशांसाठी काम करत आहे.

कधी होणार प्रदर्शित?
‘शमशेरा’ हा रणबीर कपूरचा बहुप्रतिक्षित सिनेमा आहे. या सिनेमाचे बजेट तब्बल १५० कोटी रुपये आहे. हा सिनेमा येत्या २२ जुलै रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. तसेच, या सिनेमाचा ट्रेलर २४ जून रोजी प्रदर्शित होणार आहे. हा सिनेमा हिंदीव्यतिरिक्त तमिळ आणि तेलुगू भाषांमध्येही प्रदर्शित केला जाणार आहे. या सिनेमात रणबीर आणि संजय दत्तव्यतिरिक्त वाणी कपूर (Vani Kapoor) ही अभिनेत्रीदेखील दिसणार आहे. रणबीरचा वाणीसोबतचा हा पहिलाच सिनेमा आहे.

रणबीर कपूरचे आगामी सिनेमे
रणबीर कपूरच्या आगामी सिनेमांबद्दल बोलायचं झालं, तर त्याच्याकडे बऱ्याच बिग बजेट सिनेमांची यादी आहे. रणबीरच्या ‘शमशेरा’ सिनेमाव्यतिरिक्त तो ‘ब्रह्मास्त्र’ या सिनेमातही सुपरनॅचरल अवतारात झळकेल. हा सिनेमाही सप्टेंबर महिन्यात प्रदर्शित होणार आहे. इतकेच नाही, तर तो सध्या सतत सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे.

हे देखील वाचा