Saturday, July 6, 2024

सिद्धू मुसेवालाच्या हत्येनंतर सलमान खानच्या घराबाहेर सुरक्षा तैनात, पोलिसांना मिळाली ‘ही’ गुप्त माहिती

गायक-राजकारणी सिद्धू मुसेवालाच्या (Sidhu Moosewala) हत्येनंतर लगेचच काही दिवसांनी मुंबई पोलिसांनी बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खानच्या (Salman Khan) सुरक्षेत वाढ केली आहे. सिद्धू मुसेवाला हत्याकांडातील मुख्य संशयित लॉरेन्स बिश्नोई याने काही वर्षांपूर्वी अभिनेत्यावर हल्ल्याची योजना आखली होती. हे लक्षात घेऊन पोलिसांनी सलमान खानला किती धोका आहे, याचे विश्लेषण करून त्याची सुरक्षा वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. महत्त्वाचे म्हणजे, सध्या गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई तिहार तुरुंगात बंद आहे.

राजस्थानच्या टोळीशी आहे संबंध
मुंबई पोलिस अधिकाऱ्याने मीडिया संवादादरम्यान खुलासा केला की, “आम्ही सलमान खानची सुरक्षा वाढवली आहे. राजस्थानमधील टोळ्यांनी कोणतीही हालचाल करू नये, म्हणून सलमान खानच्या अपार्टमेंटच्या आसपास पोलिस उपस्थित राहतील.” (actor salman khan security increased after sidhu moosewala murder)

पोलिसांना मिळाली गुप्त माहिती
मीडिया रिपोर्ट्सनुसार, गायक सिद्धू मुसेवालाच्या हत्येनंतर पोलिसांना सलमान खानवर झालेल्या हल्ल्याची गुप्त माहिती मिळाली. त्यानंतर असे ठरले गेले की, सलमानसोबत त्याच्या खासगी सुरक्षेसह काही मुंबई पोलिस हवालदारही असतील. उल्लेखनीय आहे की, गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा गुंड गोल्डी बरार याने मूसवालाच्या हत्येची जबाबदारी स्वीकारली आहे. याच टोळीने चार वर्षांपूर्वी सलमान खानला जीवे मारण्याची धमकी दिली होती.

का मिळाली होती सलमान खानला धमकी?
गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई सलमान खानवर नाराज असल्याचे सांगण्यात येत आहे. मीडिया रिपोर्ट्सवर विश्वास ठेवला, तर लॉरेन्स बिश्नोई काळवीटांना पवित्र मानतो. त्यामुळे काळवीट शिकार प्रकरणात सलमान खानचे नाव आल्यावर लॉरेन्स बिश्नोईने अभिनेत्याच्या हत्येचा कट रचला. मात्र, काही कारणांमुळे बिष्णोईचे हे नियोजन यशस्वी होऊ शकले नाही.

हेही वाचा

हे देखील वाचा