Monday, July 1, 2024

‘बाजीगर’ चित्रपटाला 30वर्षे पूर्ण, किंग खानने शिकवली होती शिल्पा शेट्टीला ऍक्टिंग

चित्रपटात नायक आणि खलनायक या दोन्ही भूमिका एकावेळी साकारणे एखाद्या अभिनेत्याला खूप कठीण जाते. मात्र, ‘बाजीगर’ या चित्रपटात नायक आणि खलनायकाची दुहेरी भूमिका साकारून शाहरुख खानने सर्वांनाच आश्चर्यचकित केले होते. बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शेट्टीने तिच्या कारकिर्दीची सुरुवात ‘बाजीगर’ चित्रपटातून केली. शिल्पा शेट्टी आणि काजोलची स्टाईल असो किंवा शाहरुख खानचा अभिनय, या सर्वांच्या जबरदस्त अभिनयाने रुपेरी पडद्यावर धुमाकूळ घातला होता. अब्बास-मस्तान यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेला हा चित्रपट सर्वांसाठी खास आहेच, पण शिल्पासाठीही महत्त्वाचा आहे. कारण, या चित्रपटासोबतच तिने इंडस्ट्रीत 30 वर्षे पूर्ण केली आहेत. 12 नोव्हेंबर, 1993रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला जबरदस्त यश मिळाले.

शाहरुख खानला मिळाला पहिला फिल्मफेअर पुरस्कार
‘बाजीगर’ हा काजोलचा पहिला चित्रपट ठरला, ज्याने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली. ‘ये काली काली आंखे’ या गाण्यावरचा तिचा दमदार परफॉर्मन्स आजही प्रेक्षक विसरू शकलेले नाहीत. त्याचवेळी या चित्रपटाच्या यशामुळे शाहरुखला इंडस्ट्रीत आपले पाय रोवण्यास मदत झाली. या चित्रपटानंतर शाहरुखला ‘बाजीगर’ म्हटले जाऊ लागले. या चित्रपटात खलनायकाची भूमिका शाहरुखने केली होती आणि पहिल्यांदाच त्याला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता. या चित्रपटात शिल्पाने काजोलच्या बहिणीची भूमिका साकारली होती. ‘बाजीगर’चे दिवस आठवत शिल्पाने एका रियॅलिटी शोमध्ये शाहरुखने तिला कशी मदत केली होती, हे सांगितले. शोमध्ये तिच्या पदार्पणाच्या दिवसांच्या आठवणी सांगताना शिल्पाने शाहरुखचे कौतुक केले होते.

शाहरुख खानने शिल्पा शेट्टीला केली मदत
शिल्पाने सांगितले की, “चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान मी खूप नर्व्हस होते, त्यामुळे शाहरुखने मला खूप मदत केली. तो खूप गोड आहे आणि त्याने मला नेहमी माझ्या सीन्समध्ये मदत केली. आम्ही चित्रपटातील ‘ए मेरे हमसफर’ या गाण्याचे शूटिंग करत होतो आणि मला गाण्याचे बोल लिप सिंक करायचे होते, पण मला ते नीट करता आले नाही. अशा परिस्थितीत शाहरुखने मला या गाण्याचे बोल पकडण्यासाठी मदत केली आणि लिपसिंकिंगचे तंत्र व्यवस्थित सांगितले. त्यानंतर मी ते चांगले केले.”

बाजीगर’ हा शिल्पा शेट्टीचा नव्हता पहिला चित्रपट
‘बाजीगर’ हा चित्रपट शिल्पाचा पहिला चित्रपट असल्याचे म्हटले जात असले, तरी हा तिचा पहिला चित्रपट नसल्याचे खुद्द शिल्पानेच सांगितले होते. शिल्पा म्हणाली होती की, “लोक ‘बाजीगर’ला माझा पहिला चित्रपट मानतात आणि अभिनयाच्या बाबतीत मला पहिला ब्रेक ‘गाता है मेरा दिल’ या चित्रपटात मिळाला. यावर अनेक महिने काम चालले, पण काही कारणास्तव हा चित्रपट मधेच थांबला. अशा परिस्थितीत माझा ‘बाजीगर’ हा दुसरा चित्रपट प्रदर्शित झाला असून, हा पहिलाच चित्रपट मानला जातो.”

‘बाजीगर’ हिट होण्यात चित्रपटाची कथा, कलाकार, दिग्दर्शन, संगीतासोबतच मोठा हातभार होता. अनु मलिकच्या दिग्दर्शनाखाली बनलेली सर्व गाणी प्रचंड लोकप्रिय झाली. ‘ए मेरे हमसफर’, ‘बाजीगर ओ बाजीगर’, ’छुपाना भी नहीं आता’, ‘किताबे बहुत सी पढ़ी होगी तुमने’, ‘ये काली काली आखे’ या गाण्यांनी धुमाकूळ घातला.

हेही नक्की वाचा-
निळ्या लेहेंग्यात क्रिती सेनॉन दिसतेय स्टनिंग, पाहा फोटो
मराठी अभिनेत्रीने म्हाताऱ्या आजीकडून विकत घेतल्या पणत्या, सोशल मीडियावर व्हिडीओ तूफान व्हायरल

हे देखील वाचा