कंगना रणौतचा बहुप्रतिक्षित ‘इमर्जन्सी’ या चित्रपटाचा ट्रेलर लाँच झाला आहे. चित्रपटाच्या सर्व कलाकारांनी मुंबईतील एका कार्यक्रमात भाग घेतला आणि माध्यमांशी संवाद साधताना काही प्रश्नांची उत्तरेही दिली. या चित्रपटात अटल बिहारी वाजपेयी यांची भूमिका साकारणाऱ्या श्रेयस तळपदेला जेव्हा कंगनासोबत काम करण्याचा अनुभव विचारण्यात आला तेव्हा श्रेयसने अनेक मनोरंजक खुलासे केले.
मुलाखतीत श्रेयस तळपदेने अटलबिहारी वाजपेयींच्या भूमिकेसाठी कंगनाने त्याच्याशी ज्यावेळी संपर्क साधला होता तो वेळ आठवला. श्रेयस म्हणाला, “जेव्हा कंगनाने अटलजींच्या भूमिकेसाठी माझ्याशी संपर्क साधला तेव्हा मला काय प्रतिक्रिया द्यावी हेच कळत नव्हते. तिने मला जे करायला सांगितले होते त्याचा विचार करून मी गोंधळलो आणि घाबरलो. “मी ही भूमिका स्वीकारू की सोडू? ” हा मोठा प्रश्न होता. अभिनेत्याने पुढे दावा केला की जर कंगना नसती तर ही भूमिका साकारणे त्याच्यासाठी सोपे नव्हते.
कंगनाचे कौतुक करताना श्रेयस म्हणाला, “ती माझ्यासाठी खूप प्रेरक आहे. आम्ही तिला अभिनेत्री म्हणून काम करताना पाहिले आहे, पण जेव्हा मी इमर्जन्सीच्या सेटवर गेलो होतो, तेव्हा तिने स्वत:ला चित्रपटासाठी ज्या प्रकारे वाहून दिले ते आश्चर्यकारक होते. टेक दरम्यान, मी माझ्या बाजूने काही एक्स्ट्रा घालण्याचा प्रयत्न केला, पण ती आली आणि माझ्या कानात कुजबुजली आणि म्हणाली की रिहर्सल दरम्यान तुम्ही जे काही सराव केलात त्यालाच चिकटून राहा.
त्यानंतर श्रेयस तळपदेने विनोद केला, “ती ज्या प्रकारे अनेक गोष्टी करते, उद्या जर त्यांनी पुष्पाचा तिसरा भाग बनवला तर मला वाटते की त्यांनी कंगना राणौतला कास्ट करावे कारण हे तिचं ब्रीद आहे ‘झुकेगा नही साला कभी भी’.”
कंगना रणौतने ‘इमर्जन्सी’चे दिग्दर्शन केले असून त्यात ती मुख्य भूमिकेत आहे.तिला तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या भूमिकेत पाहण्यासाठी लोक खूप उत्सुक आहेत. अनुपम खेर, मिलिंद सोमण, दिवंगत सतीश कौशिक, महिमा चौधरी आणि श्रेयस तळपदे यांनीही या चित्रपटात काम केले आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा –
इमर्जन्सी नंतर अभिनय सोडणार कंगना; घेतला चित्रपटांतून निवृत्त होण्याचा निर्णय…