Wednesday, December 18, 2024
[aioseo_breadcrumbs]

‘माझे सुपरहिरो…’, म्हणत मराठमोळ्या ‘सिद्धू’ने वडिलांना दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा!

सिनेसृष्टीत ‘सिद्धू’ म्हणून ओळखला जाणारा मराठमोळा अभिनेता सिद्धार्थ जाधवला कोणत्याही परिचयाची गरज नाही. एक नम्र पार्श्वभूमी आणि सावळे पण भोळे रूप घेऊन, सिद्धार्थने चित्रपटसृष्टीत अथक परिश्रम, उत्कटतेने त्याचा मार्ग स्वतः कोरला. तो एक बहुप्रतिभावान अभिनेता आहे. तसेच हिंदी असो वा मराठी त्याने दोन्ही इंडस्ट्रीमध्ये आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे. सिद्धार्थ सोशल मीडियावर खूप सक्रिय असतो. तसेच तो सतत फोटो आणि व्हिडिओ शेअर करून चाहत्यांशी संवाद साधत असतो. नुकताच त्याने पोस्ट केलेला एक फोटो, आता चाहत्यांच्या चर्चेचा विषय बनलाय.

सिद्धार्थने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोमध्ये तो त्याच्या वडिलांसोबत दिसत आहे. मात्र, हा फोटो त्याने एका खास निमित्ताने शेअर केला आहे. आज (१ जून) त्याचे वडील रामचंद्र जाधव यांचा वाढदिवस आहे. वडिलांसोबतचा हा खास फोटो शेअर करत अभिनेत्याने त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छाही दिल्या आहेत. याशिवाय त्याने वडिलांना सुपरहिरो देखील म्हटले आहे.

हा खास फोटो शेअर करत, सिद्धूने कॅप्शनही अगदी खास दिले आहे. त्याने आपल्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे, “माझे सुपरहिरो रामचंद्र जाधव. जून हा महिना माझ्यासाठी खूप खास आहे, कारण या महिन्याची सुरुवात माझ्या वडिलांच्या वाढदिवसापासून होते. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा पप्पा. शेवटपर्यंत तुम्हाला प्रेम करत राहीन.” असे म्हणत त्याने वडिलांवरचे आपले प्रेम व्यक्त केले आहे. नेटकरीही फोटो खाली शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.

सिद्धार्थ अलीकडेच प्रभूदेवाच्या दिग्दर्शनाखाली बनत असलेल्या, ‘राधे: युअर मोस्ट वाँटेड भाई’मध्ये महत्त्वाची भूमिका साकारताना दिसला. या चित्रपटात सलमान खान आणि दिशा पटानी मुख्य भूमिकेत पाहायला मिळाले. सिध्दार्थने ‘अगं बाई अरेच्चा’, ‘जत्रा’, ‘ये रे ये रे पैसा’, ‘दे धक्का’, ‘हुप्पा हुइया’, ‘टाइम प्लीज’, ‘धुरळा’ इत्यादी चित्रपटात अभिनय करून, प्रेक्षकांची मने जिंकली. यानंतर त्याने बॉलिवूडमध्येही ‘गोलमाल’, ‘गोलमाल रिटर्न्स’, ‘सिटी ऑफ गोल्ड’ आणि ‘सिम्बा’ या चित्रपटात महत्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हे देखील वाचा