Friday, July 5, 2024

‘मी शांत बसणार नाही…’, आमिर खानसोबत काम केलेल्या अभिनेत्याला जीवे मारण्याची धमकी, भाजपवर मोठा आरोप

कलाकारांना धमकी देणारे फोन, मेसेज, कमेंट येताना आपण अनेक वेळा पाहिले आहे. या सर्व गोष्टी कलाकार सोशल मीडियावर शेअर करताना दिसतात. असेच काहीसे झाले आहे दाक्षिणात्य अभिनेता सिद्धार्थसोबत. त्यानेे गुरुवारी (२९ एप्रिल) आरोप लावला आहे की, तमिळनाडूतील भाजपच्या सदस्यांनी त्याचा फोन नंबर लीक केला आहे. तसेच त्याला आणि त्याच्या कुटुंबाला ५०० पेक्षा अधिक वेळा शिव्या देणारे फोन आले. याव्यतिरिक्त जीवे मारण्याची धमकीही देण्यात आली.

त्याने पुढे बोलताना म्हटले की, तक्रार केल्यानंतर त्याला पोलीस सुरक्षा मिळाली. त्याने ट्वीट करत लिहिले की, ‘माझा फोन नंबर तमिळनाडू भाजप आणि भाजपच्या आयटी सेल सदस्यांनी लीक केला. मागील २४ तासांपेक्षा अधिक वेळा शिव्या, बलात्कार आणि मला तसेच माझ्या कुटुंबातील सदस्यांना जीवे मारण्याची धमकी देणारे ५०० पेक्षा अधिक फोन आले आहेत.’

https://twitter.com/Actor_Siddharth/status/1387653507814072325

भाजपवर निशाणा साधत तो पुढे म्हणाला, “सर्व नंबर (भाजपशी संबंधित आणि डीपीसोबत) रेकॉर्ड केले आहेत आणि पोलिसांना देत आहे. मी शांत राहणार नाही. प्रयत्न करत राहा.” विशेष म्हणजे सिद्धार्थने आपल्या ट्वीटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांनाही टॅग केले आहे.

https://twitter.com/Actor_Siddharth/status/1387657671826837505

भाजपने अभिनेत्याचे हे आरोप फेटाळले आहेत. भाजपच्या तमिळनाडू युनिटच्या मीडिया विंगचे अध्यक्ष एएनएस प्रसाद यांनी आरोप केला की, अभिनेत्याने आपल्या पक्षावर आणि प्रमुख नेत्यांविरुद्ध निराधार आरोप करून ‘स्वस्त लोकप्रियता’ मिळविण्याचा प्रयत्न केला.

यानंतर सिद्धार्थने एका ट्वीटमध्ये सुरक्षा देण्यासाठी पोलिसांचे आभार मानले आहेत. त्याने म्हटले की, ‘तरीही मी नम्रतापूर्ण हा विशेषाधिकार सोडेल. जेणेकरून या अधिकाऱ्यांचा या कोरोना व्हायरसदरम्यान इतर चांगल्या ठिकाणी वापर केला जाऊ शकेल. पुन्हा एकदा धन्यवाद.’

सिद्धार्थने सन २००४ साली ‘बॉयज’ या चित्रपटातून पदार्पण केले होते. विशेष म्हणजे त्याने ‘रंग दे बसंती’ या चित्रपटातही काम केले होते. यामध्ये सुपरस्टार आमिर खानही होता.

हे देखील वाचा