Wednesday, July 3, 2024

व्हिडिओ: कोणत्याही वेळी येणाऱ्या फोन कॉल्समुळे सोनू सूदचा दूधवाला चिंतेत; म्हणाला ‘इतकं झेपत नाही’

मागील वर्षीपासून कोरोना व्हायरससारख्या भयानक व्हायरसमुळे लोकांची दैना झाली आहे. अनेक कामगार पोटापाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी शहराकडे वळले होते. मात्र, या व्हायरसमुळे त्यांना आपल्या गावी परतण्यास प्रवृत्त केले. अशामध्ये इतक्या मोठ्या संख्येने मजुरांना गावाकडे जाण्यासाठी कोणतीही सोय नव्हती. त्यावेळी त्यांच्यासाठी ‘देवदूता’प्रमाणे अभिनेता सोनू सूद पुढे आला. आता जवळपास कोरोनाच्या परिस्थितीला एक वर्ष उलटले आहे. तरीही सोनूचे मदतकार्य सुरूच आहे. दिवस- रात्र त्याला फोन येत असतात. तो प्रत्येक शक्य ती मदत करत आहे. मग ती रुग्णालयात बेड्स उपलब्ध करून देणे असो किंवा व्हेंटिलेटर्स किंवा मग रेमडेसिविर इंजेक्शन असो. या सर्व गोष्टी तो गरजूंना देण्याचा प्रयत्न करत आहे. या कामात त्याने त्याच्या सर्व कर्मचाऱ्यांना लावले आहे. यामध्ये त्याचा दूध वाला गुड्डू याचाही समावेश आहे. तोही लोकांचे फोन उचलतो. त्याच्यासंदर्भातील एक व्हिडिओ नुकताच सोनूने सोशल मीडियावर शेअर केला आहे.

सोनूने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये गुड्डू आपल्या समस्या अभिनेत्याला सांगत आहे. तो म्हणत आहे की, “मी फोन उचलून उचलून कंटाळून जातो.” सोनूने शेअर केलेल्या या व्हिडिओवर चाहते प्रतिक्रिया देत सोनूची जोरदार प्रशंसा करत आहेत.

हा व्हिडिओ शेअर करत सोनूने मजेशीर कॅप्शनही लिहिले आहे. त्याने शेअर केलेल्या या व्हिडिओत दूध वाल्या गुड्डूला तो विचारतो की, “मी तुला नंबर दिला आहे, तू लोकांचे ऐकून घेतो की नाही?” यावर प्रत्युत्तर देत गुड्डू म्हणतो की, “कधीही फोन येतो. सकाळी सहा वाजता फोन येतो, कधी एक वाजता, तर कधी चार वाजता. इतका कंटाळलोय की सांगायलाच नको.”

पुढे सोनू त्याला विचारतो की, “मलाही फोन येतात, मीही ऐकतो त्यांचं. तुला काय चिंता आहे?” त्यावर गुड्डू प्रत्युत्तर देत म्हणाला की, “आमच्याकडे इतकी क्षमता नाही. इतके झेपत नाही.” या व्हिडिओदरम्यान गुड्डूला एक फोन येतो.

सोनूने या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “माझा दूध वाला गुड्डूनेही हात वर केले आहेत. तो आता आणखी दबाव सहन करू शकत नाही. प्रत्येकाला माहित करून घ्यायचे आहे की, मी कसे काम करतो. त्यांनी माझ्याकडे यावे आणि माझ्यासोबत एक दिवस राहून पाहावे.”

सोनू सातत्याने गरजू व्यक्तींची मदत करत आहे. आता मदतीसाठी लोक त्याच्या घराच्या बाहेरही गर्दी करत आहेत. इतकेच नव्हे, तर अभिनेताही आपल्या घराबाहेर येऊन त्यांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करतो. मागील काही दिवसात सोनूने ऑक्सिजन सिलेंडर्स आणि आयसीयू बेड्ससाठी हेल्पलाईन नंबरही जारी केला होता.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हे देखील वाचा