Sunday, February 8, 2026
Home साऊथ सिनेमा कॅन्सरशी झुंज देताना प्रसिद्ध अभिनेत्री जया वाहिनी यांचे निधन, चित्रपटसृष्टीत शोककळा

कॅन्सरशी झुंज देताना प्रसिद्ध अभिनेत्री जया वाहिनी यांचे निधन, चित्रपटसृष्टीत शोककळा

तेलुगू टेलिव्हिजन आणि चित्रपटसृष्टीतून एक अत्यंत दुःखद बातमी समोर आली आहे. ज्येष्ठ अभिनेत्री जया वाहिनी उर्फ वासवी, पद्मा यांचे बुधवारी त्यांच्या मूळ गावी विजयनगरम येथे निधन झाले. त्या दीर्घकाळापासून स्तनकर्करोगाशी (Breast Cancer) झुंज देत होत्या. उपचारादरम्यानच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनामुळे तेलुगू टीव्ही आणि फिल्म इंडस्ट्रीसह चाहत्यांमध्ये शोककळा पसरली आहे.

अभिनेत्री कराटे कल्याणी यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून जया वाहिनी (Jaya Vahini)यांच्या निधनाची माहिती दिली. भावनिक पोस्ट शेअर करत त्यांनी लिहिले की, “मी वाहिनीच्या बहिणीला वाचवण्यासाठी खूप प्रयत्न केले, पण काही वेळापूर्वीच त्या आपल्या जन्मस्थानी विजयनगरम येथे परमेश्वराच्या चरणी विलीन झाल्या.” कराटे कल्याणी यांनी सांगितले की, त्या वाहिनी यांना लहानपणापासून ओळखत होत्या आणि दोघींचे घर एकाच परिसरात होते.

१९७८ साली विजयनगरम येथे जन्मलेल्या जया वाहिनी यांनी मनोरंजनसृष्टीत ‘जया वाहिनी’ या नावाने ओळख निर्माण केली. सुरुवातीला छोट्या भूमिका साकारत त्यांनी आपल्या करिअरची सुरुवात केली. मेहनत, जिद्द आणि अभिनय कौशल्याच्या जोरावर त्यांनी तेलुगू आणि तमिळ चित्रपटांसह अनेक लोकप्रिय टीव्ही मालिकांमध्ये काम केले. विशेषतः निगेटिव्ह भूमिका साकारण्यात त्यांचा हातखंडा होता.

जया वाहिनी यांना टीव्ही मालिकांमधून विशेष लोकप्रियता मिळाली. छोट्या पडद्यावर त्यांनी घराघरात आपली ओळख निर्माण केली. चित्रपटांमध्ये त्यांनी २०१९ मधील ‘रघुपती वेंकैया नायडू’ या चित्रपटात अभिनेता व्ही.के. नरेश यांच्यासोबत काम केले होते. त्यानंतर त्या शेवटच्या वेळी ‘बहिरभूमी’ या चित्रपटात दिसल्या.

जया वाहिनी गेल्या काही वर्षांपासून कर्करोगाशी झुंज देत होत्या. उपचारासाठी आर्थिक मदतीचे आवाहनही करण्यात आले होते, ज्याला अनेक कलाकार आणि चाहत्यांनी प्रतिसाद दिला. मात्र तब्येत खालावत गेल्याने डॉक्टरांनी त्यांना घरी नेण्याचा सल्ला दिला आणि अखेर त्यांनी आपल्या गावीच अखेरचा श्वास घेतला.

जया वाहिनी यांच्या निधनानंतर तेलुगू चित्रपट व टीव्ही इंडस्ट्रीतील अनेक कलाकारांनी सोशल मीडियावर शोकसंवेदना व्यक्त केल्या आहेत. त्यांच्या सशक्त अभिनयाने आणि लक्षवेधी भूमिकांनी त्या कायम प्रेक्षकांच्या स्मरणात राहतील. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो, अशी प्रार्थना सर्व स्तरातून केली जात आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा 

हेही वाचा

मिर्जापुर द मूव्ही: कालीन भैय्यांच्या सत्तेला आव्हान देणारे दोन OG गँगस्टर्स, तर 5 नव्या चेहऱ्यांनी रंगणार कथा

हे देखील वाचा