सत्तर आणि ऐंशीचे दशक गाजवणाऱ्या अभिनेत्रींमध्ये सदाबहार अभिनेत्री रेखा यांचे नाव आवर्जुन घेतले जाते. रेखा यांनी त्यांच्या कारकीर्दीत अनेक सुपरहिट सिनेमे दिले आहेत. त्यांच्याबद्दल खास बाब अशी की, त्यांनी वयाच्या अवघ्या तिसऱ्या वर्षापासून सिनेमात काम करायला सुरुवात केली होती. रेखा या आपल्या काळातील सर्वात लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक बनल्या होत्या. मात्र, हे जाणून तुम्हालाही आश्चर्य वाटेल की, रेखा यांना कधीही अभिनेत्री बनायचे नव्हते. याचा खुलासा त्यांनी सन 1986 मध्ये दिलेल्या एका मुलाखतीत केला होता.
रेखा (Rekha) यांनी म्हटले होते की, सुरुवातीला त्यांना सिनेमात काम करण्यासाठी बळजबरी केली होती. रेखा या दिवंगत अभिनेते पुष्पवल्ली आणि जेमिनी गणेशन यांची मुलगी आहेत. त्यांनी 1958 मध्ये आलेल्या ‘इंति गुट्टू’ या तेलुगू सिनेमातून आपल्या अभिनय कारकीर्दीची सुरुवात केली होती.
त्या बी. एन. रेड्डी यांच्या 1966 सालच्या ‘रंगुला रत्नम’ या तेलुगू सिनेमात स्क्रीनवरील बेबी भानुरेखा या नावाने झळकल्या होत्या. त्यानंतर त्यांनी 1970मध्ये आलेल्या ‘सावन भादों’ या सिनेमातून हिंदी सिनेसृष्टीत पाऊल ठेवले होते. त्यांच्यासोबत सिनेमात नवीन निश्चल यांनी मुख्य भूमिका साकारली होती.
रेखा यांनी अभिनेत्री व्हावे अशी त्यांच्या आईची होती इच्छा
रेखा यांना सन १९८६मध्ये माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत त्यांच्या सुपरस्टार बनण्याच्या प्रवासाबद्दल विचारले होते. त्यावेळी बोलताना त्या म्हणाल्या होत्या की, “माझा सिनेप्रवास सुरू झाला, तेव्हा मी खूप लहान होते. मी रातोरात स्टार झाले. मला कधीच अभिनेत्री व्हायचं नव्हतं. मी अभिनेत्री व्हावे अशी माझ्या आईची इच्छा होती. मला हानून मारून अभिनेत्री बनवले गेले आहे.”
रेखा ३ वर्षांच्या वयापासून करतायत काम
पुढे बोलताना त्यांनी सांगितले की, “मी बालकलाकार होते आणि मी ३ वर्षांची असताना काम करायला सुरुवात केली. मी १३ वर्षांची झाल्यावर मुंबईत आले. शत्रुजित पाल मद्रासमध्ये एका सिनेमासाठी नवीन अभिनेत्रीच्या शोधात होते. त्यांना कुणीतरी सांगितलं की, एक साऊथ इंडियन मुलगी आहे जिला थोडं हिंदी बोलता येतं, पण तेव्हा मला हिंदी येत नव्हतं.”
रेखा यांनी हिंदी सिनेमात काम करण्यास दिला होता नकार
त्यांनी रेखा यांच्या आईशी संपर्क साधला. रेखा यांनी सांगतिले होते की, “त्यांनी मला विचारले की, मला हिंदी येते का, त्यावेळी मी म्हणाले, ‘नाही.’ मग त्यांनी मला विचारले, ‘तुला हिंदी चित्रपटात काम करायचे आहे का?’ त्यावर मी म्हणाले, ‘नाही.’ यानंतर ते म्हणाले, ‘ठीक आहे, आम्ही उद्या तुला सिनेमासाठी साईन करू.”
रेखा यांची कारकीर्द
रेखा यांच्या कारकीर्दीवर नजर टाकली, तर त्यांनी आतापर्यंत १८०हून अधिक सिनेमात काम केले आहे. त्यामध्ये ‘उमराव जान’, ‘खुबसूरत’, ‘मुकद्दर का सिकंदर’, ‘खून भरी मांग’, ‘नमक हराम’ यांसारख्या सिनेमांचा समावेश आहे. त्या शेवटच्या २०१८ साली आलेल्या ‘यमला पगला दीवाना फिरसे’ या सिनेमात दिसल्या होत्या.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-