Monday, July 1, 2024

मंडळी… आपली उर्मिला झाली शिवसैनिक! बॉलिवूडमधील ‘खुबसुरत’ गर्लच्या ‘हाता’वर आता शिवबंधन, वाचा सविस्तर

बॉलिवूडची रंगीला गर्ल म्हणजेच उर्मिला मातोंडकर यांनी आज दुपारी मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे तसेच त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या उपस्थितीत मातोश्रीवर शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केला. या पक्षप्रवेशावेळी त्यांच्या हाताला रश्मी ठाकरे यांनी शिवबंधन बांधत त्यांचं स्वागत केलं.

यावेळी मातोश्रीवर मुख्यमंत्र्यांसह पर्यावर्णमंत्री आदित्य ठाकरे, राज्यसभा सदस्या खासदार प्रियांका चतुर्वेदी, तसेच मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर इत्यादी उपस्थित होते. उर्मिला यांनी यावेळी चेहऱ्यावर लावलेला भगवा मास्क आकर्षणाचा विषय ठरला आहे. दुपारी चार वाजता पत्रकार परिषद घेऊन गौप्यस्फोट करणार असल्याचे उर्मिला यांनी पत्रकारांना सांगितलं आहे.

अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी २०१९च्या लोकसभेच्या निवडणुकीवेळी काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश केला होता आणि उत्तर मुंबई मतदारसंघात भाजपच्या गोपाळ शेट्टी यांच्या विरोधात त्यांनी निवडणूकही लढवली होती. यात त्यांचा पराभव जरी झाला असला तरी एक चांगली टक्कर शेट्टीना त्यांनी या मतदारसंघात दिली होती. यानंतर पुढील सहा महिन्यातच त्यांनी पक्षातील अंतर्गत कलहामुळे वैतागुन हाताला सोडचिट्ठी दिली होती.

काँग्रेस सोडल्यानंतर उर्मिला राजकारणात काही फारश्या सक्रिय दिसल्या नव्हत्या परंतु सामाजिक प्रश्नांना समाजमाध्यमांवर वाचा फोडत होत्या. आता सुद्धा मुंबईला पीओके म्हटल्यानंतर कंगनाला त्यांनी त्यांच्या ट्विटर अकाउंटवरून खडे बोल सुनावले होते. मागच्या काही काळात विधानपरिषदेवर राज्यपाल नियुक्त आमदारांच्या यादी मध्ये शिवसनेतर्फे उर्मिला यांचे नाव चर्चेत होते परंतु त्याला सबळ पुरावे नव्हते. आज शिवसेनेत पक्षप्रवेश केल्याने त्यांच्या उमेद्वारीवर एकप्रकारे शिक्कामोर्तब झाले आहे. तत्पूर्वी त्यांना काँग्रेसकडून देखील विधानपरिषदेवर जाण्यासाठी उमेदवारी ऑफर केली होती परंतु राज्यसभेवर जाण्याचा मानस असल्याचे सांगत त्यांनी ती ऑफर नाकारली होती असे विजय वडेट्टीवार यांनी माध्यमांना सांगितले.

उर्मिला मातोंडकर यांनी आतापर्यंत बॉलिवूडमध्ये रंगीला, जुदाई, सत्या, लज्जा, कौन, एक हसीना थी यासारख्या अनेक सिनेमांमध्ये मुख्य भूमिका साकारल्या आहेत. आजोबा हा मराठी सिनेमा त्यांच्या अखेरचा चित्रपट आहे. तसेच अनेक हिंदी मराठी रिऍलिटी शोजमध्ये उर्मिला यांनी परीक्षण देखील केलं आहे. शिवसेनेत नुकतंच प्रवेश केल्यानंतर त्या काय गौप्यस्फोट करणार या कडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

हे देखील वाचा