सुप्रसिद्ध गायक उदित नारायण यांचा मुलगा अभिनेता आणि निवेदक आदित्य नारायण हा मंगळवार (१ डिसेंबर) रोजी लग्नाच्या बेडीत अडकला आहे. श्वेता अग्रवाल हीच्यासोबत आदित्यची लगीनगाठ बांधली गेली आहे.
आदित्यच्या लग्नाचे व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहेत. या व्हिडिओमध्ये त्याचे वडील उदित नारायण आणि आई दीपा नारायण हे देखील धमाल करताना दिसत आहेत. आदित्यवर सध्या त्याच्या चाहत्यांच्या शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
…अखेर आदित्य बोहल्यावर चढला
आदित्य आणि श्वेता यांच्या लग्नाबाबत अनेक दिवस चर्चा रंगत होत्या. यानंतर काल (मंगळवार, १ डिसेंबर) अदित्यने त्याचे वडिल उदित नारायण यांच्या वाढदिवसाच्या दिवशीचाच मुहूर्त काढत श्वेतासोबत विवाह केला आहे. त्यानंतर आता त्यांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडिओ समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत.
या फोटोजमध्ये दोघेही नववधू-वर हे मेड फॉर इच अदर असल्यासारखेच दिसत आहेत. त्यांचा जोडादेखील, ‘लक्ष्मी नारायणा’सारखा असल्याचे चाहते बोलत आहेत.
वडिल उदित नारायण यांची मुलाच्या लग्नात धमाल….
आदित्यचे बाबा प्रख्यात गायक उदित नारायण हे देखील काही फोटोजमध्ये धमाल करताना दिसत आहेत. तर यावेळी आदित्यची आई दीपा नारायण या त्याचे औक्षण करताना दिसत आहेत.
आदित्यच्या लग्नाची चर्चा गेल्या दोन ते तीन वर्षांपासून सुरूच होती. त्याचे नाव अगोदर गायिका नेहा कक्कर हिच्याशी जोडले गेले होते. इतके की रिऍलिटी शोजमध्ये त्यांच्या लग्नाचे एपिसोड्स बनवले जायचे. हे प्रकरण अगदी टोकाला गेल्यानंतर दोघांनीही माध्यमांसमोर येऊन या सर्व फक्त अफवा असल्याचे सांगितले होते.
मागील महिन्यात नेहाचा रोहनप्रितसोबत विवाह झाल्यावर या चर्चांना पूर्णविराम मिळाला होता. आता आदित्यनेसुद्धा त्याची जीवनसाथी निवडला आहे आणि आयुष्याची दुसरी इनिंग सुरू केली आहे.
आदित्यने बॉलिवूडमध्ये बालकलाकार म्हणून पदार्पण केले होते आणि तो त्यात यशस्वी देखील ठरला होता. परंतू, तारुण्यात आल्यावर मात्र त्याला अभिनयात फारशी चमक दाखवता आली नाही. असे असले तरी एक गायक म्हणून आणि निवेदक म्हणून त्याने इंडस्ट्रीमध्ये नाव कमावले आहे.