अवघ्या 20 व्या वर्षी बॉलिवूडमध्ये दमदार पदार्पण करत सारा अर्जुन सध्या यशाच्या शिखरावर आहे. आदित्य धर दिग्दर्शित सुपरहिट चित्रपट ‘धुरंधर’मधून सारा अर्जुनने (Sara Arjun)बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेतली आणि पहिल्याच चित्रपटातून प्रेक्षकांच्या मनात आपले खास स्थान निर्माण केले. ‘धुरंधर’ने जगभरात 1100 कोटींचा टप्पा पार केल्याने सारा अर्जुनचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे.
या ऐतिहासिक यशानंतर सारा अर्जुनने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर एक भावनिक पोस्ट शेअर करत प्रेक्षकांचे मनापासून आभार मानले आहेत. चित्रपटाला मिळालेल्या प्रेमामुळे आणि पाठिंब्यामुळे ती कृतज्ञ असल्याचे तिने आपल्या पोस्टमधून व्यक्त केले.
सारा अर्जुनने आपल्या पोस्टमध्ये लिहिले, “माझे सर्वात मोठे धुरंधर म्हणजे प्रेक्षक. आजकाल असं म्हटलं जातं की प्रेक्षकांमध्ये आता लांब कथा ऐकण्याचा संयम उरलेला नाही आणि सिनेमाचं महत्त्व कमी झालं आहे. पण तुम्ही हे पूर्णपणे चुकीचं ठरवलंत. तुम्ही दाखवून दिलंत की जेव्हा लोक एखाद्या गोष्टीवर खऱ्या अर्थाने विश्वास ठेवून एकत्र येतात, तेव्हा काय घडू शकतं.”
पुढे सारा लिहिते, “‘धुरंधर’ची ही संपूर्ण वाटचाल तुमच्यामुळेच शक्य झाली आहे. तुमचं प्रेम, तुमचा प्रत्येक क्षण या चित्रपटासाठी अमूल्य आहे. प्रेक्षकांवर आमचं कोणतंच नियंत्रण नसतं आणि हाच या प्रवासाचा सर्वात सुंदर भाग आहे. आम्ही आमचं सर्व काही देतो, या विश्वासावर की कुणीतरी कुठेतरी या कथेशी जोडला जाईल. आणि जेव्हा तो जोड निर्माण होतो, तो आयुष्यातील सर्वात सुंदर अनुभव असतो.”
आपल्या पोस्टच्या शेवटी सारा अर्जुनने नववर्षाच्या शुभेच्छा देताना लिहिले,“मी अजून माझ्या करिअरच्या सुरुवातीच्या टप्प्यात आहे. इतक्या लवकर इतकं प्रेम आणि प्रोत्साहन मिळणं हे माझ्यासाठी शब्दांच्या पलीकडचं आहे. याचं संपूर्ण श्रेय मी स्वतःकडे घेत नाही, तर या चित्रपटाच्या निर्मात्यांकडे जाते. या टीमचा भाग असल्याचा मला अभिमान आहे. नववर्षाच्या सुरुवातीला मी तुम्हा सर्वांना उत्तम आरोग्य, प्रेम, शांती आणि समृद्धीच्या शुभेच्छा देते.”
‘धुरंधर’च्या यशासोबतच सारा अर्जुनचा हा भावनिक संदेश सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चेत असून, प्रेक्षकांकडून तिच्या प्रामाणिकपणाचं भरभरून कौतुक केलं जात आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा
रणवीर सिंहची ‘धुरंधर’ने बॉक्स ऑफिसवर मोडले 5 रेकॉर्ड, 1200 कोटीवर नजर, तर आतापर्यंत केली इतकी कमाई










