बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या ब्लॉगमध्ये शस्त्रक्रियेचा उल्लेख केला होता. तेव्हापासूनच त्यांच्या चाहत्यांच्या मनात चिंतेचे वातावरण पसरले होते. त्यामुळे त्यांना नेमकं काय झालं आणि कसली शस्त्रक्रिया होणार आहे या सर्व गोष्टींवर चाहत्यांच्याकडून प्रश्न उपस्थित केले गेले होते. त्यांनी आपल्या ब्लॉगमध्ये ‘मेडिकल कंडिशन.. सर्जरी..या यापेक्षा अधिक काही लिहू शकत नाही असे लिहीले होते आणि तेव्हापासूनच त्यांची प्रकृती चांगली व्हावी यासाठी जो तो प्रार्थना करीत होता.
एक वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार, अमिताभ बच्चन यांना मोतीबिंदू झाला होता आणि हीच शस्त्रक्रिया त्यांच्यावर करायची होती. त्यांची एका डोळ्यावरील शस्त्रक्रिया नुकतीच पार पडली असून ते सुखरूप असल्याचे बोलले जात आहे. दुसऱ्या डोळ्यावर देखील ते लवकरच उपचार घेणार असल्याचे त्यांनी सोशल मीडियाद्वारे सांगितले होते. सध्या त्यांना डिस्चार्ज दिला असून ते घरी आराम करत आहेत.
बिग बि यांना याअगोदर कोरोनाची सुद्धा लागण झाली होती. त्यावेळी ते बरेच दिवस रुग्णालयात दाखल होते. आपली तब्येत बरी झाल्यानंतर त्यांनी लगेच शूटिंगला देखील सुरुवात केली होती. परंतु त्यांची तब्येत पुन्हा खालावल्याने चाहत्यांच्या मानत त्यांच्याविषयी चिंता निर्माण झाली होती. आता त्यांना डिस्चार्ज दिल्यामुळे त्यांचे चाहते फार प्रसन्न आहेत.
आता हे हळू हळू बरे होत आहेत आणि त्यांच्या तब्येतीत देखील सुधारणा होत आहे. त्यांनी नुकतीच आपली एक कविता चाहत्यांसोबत शेयर केली आहे. यात त्यांनी त्यांची सध्याची परिस्थिती या कवितेच्या माध्यमातून मांडली आहे. ते म्हणतात की, ‘मी दृष्टीहीन असलो तरी दिशाहीन नाही. मला आपण दिलेल्या प्रेमाबद्दल आणि काळजीबाबद्दल मी आपल्या सर्वांचा आभारी आहे.” आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर त्यांनी आपला फोटो शेयर केला आहे.
आपली ही शस्त्रक्रिया जर व्यवस्थित पार पडली तर, विकास बहल सोबत मी माझ्या नवीन चित्रपटासाठी लवकरच काम सुरू करेन असे अमिताभ बच्चन यांनी सांगितले होते. त्यामुळे त्यांच्या दुसऱ्या डोळ्यांची शस्त्रक्रिया कधी पार पडेल जेणेकरून ते पुन्हा एका नवीन जोमाने आणि जोशाने काम करताना दिसतील अशी त्यांच्या चाहत्यांना अपेक्षा आहे.
अमिताभ बच्चन यांच्या झुंड या आगामी या चित्रपटाची तारीख निश्चित झाली असून, येत्या १८ जूनला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. सध्या ते अजय देवगन दिग्दर्शित एका चित्रपटाच्या चित्रीकरणात बिझी होते. या चित्रपटात त्यांच्यासोबत अजय देवगन, बोमन इराणी आणि रकुल प्रीत सिंग यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. याशिवाय त्यांचा चेहरे हा चित्रपट देखील प्रदर्शनाच्या प्रतीक्षेत आहे. याशिवाय ते आणखी काही चित्रपटात देखील दिसणार आहेत.