Saturday, June 29, 2024

ट्विटरनंतर आता कंगनाने साधला इंस्टाग्रामवर निशाणा, म्हणाली ‘२०२४ निवडणुकीत भाजपला धोका’

बॉलिवूडची ‘पंगा क्वीन’ म्हणून अभिनेत्री कंगना रणौतला ओळखले जाते. कंगना आपल्या रोखठोक वक्तव्यांमुळे चर्चेत असते. ती नेहमीच देशातील प्रत्येक घडामोडीवर आपले मत स्पष्ट करत असते. मग ते शेतकरी आंदोलन असो किंवा मग बॉलिवूडमधील गोष्टी, या सर्वांवर ती परखडपणे बोलते. तिच्या या वक्तव्यांमुळे अनेकवेळा वाद उभे ठाकतात. अशातच आता ट्विटरवर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्यानंतर आता तिने इंस्टाग्रामवरही निशाणा साधला आहे. तिने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील युजर्सच्या सामंजस्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. सोबतच या प्लॅटफॉर्मला साम्यवादी आणि जिहादी लोकांचा अड्डा म्हणत येत्या निवडणुकीत भाजपला धोका असल्याचे सांगितले.

कंगनाने आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर दोन ट्वीट केले आहेत. त्यातील पहिल्या ट्वीटमध्ये तिने म्हटले की, ‘इंस्टाग्राम हे मूर्ख लोकांनी भरलेले असू शकते. येथे बुद्ध्यांकांची कमतरता असह्य आहे. फक्त छोट्या छोट्या व्यवसायाला येथे एक्सपोझर मिळतो, ही एक चांगली गोष्ट आहे. आता विरोधी पक्ष त्याचा वापर स्वत: साठी करत आहेत. हे अशा मूर्खांनी भरलेले आहे, जे पश्चिमेच्या मूर्खपणाला चालना देतात आणि भाजपविरूद्ध द्वेष पसरवतात.

https://twitter.com/KanganaTeam/status/1386681926396825601

कंगना इतकं बोलूनच थांबली नाही, तर तिने आणखी एक ट्वीट करत रील्सवरही निशाना साधला. तिने लिहिले की, ‘हे तर मध्यमवर्गीयांचे टिक टॉक आहे. या मूर्खांचे भांडवलदार, साम्यवादी आणि जिहादींनी अपहरण केले आहे. येत्या २०२४ च्या निवडणुकीत भाजपसाठी हे धोकादायक ठरू शकते. जर हे विदुषक फॅशनच्या नावावर शर्टच्या खाली सायकलिंग शॉर्ट घालू शकतात, त्यांना कोणत्याही गोष्टीसाठी भ्रमित केले जाऊ शकते.

https://twitter.com/KanganaTeam/status/1386683624481775618

कंगनाचे ट्वीट पाहून सोशल मीडियावर तिला फॉलो करणारे युजर नाराज झाले आहेत. तिच्या विचारांवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

यापूर्वी कंगनाने ट्विटरच्या धोरणांवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. तिने ट्विटरचे सीईओ जॅक डॉर्सी यांना टॅग करत लिहिले होते की, ‘इस्लामिक देशांसमोर आणि चिनी प्रचारासमोर आपण विकले गेलात. आपण फक्त आपल्या फायद्यासाठी भूमिका घेता. आपण इतरांच्या विचारांबद्दल निर्लज्जपणे असहिष्णुता दाखवत आहात. ट्विटर यावेळी स्वत: च्या लोभाचा गुलाम झाला आहे. मोठे दावे आवश्यक नाहीत. हे खूप लाजीरवाणे वाटते.

कंगना ही भाजपचे समर्थन करते. सध्या कोरोना व्हायरसदरम्यान देशातील परिस्थितीवर केंद्र सरकारवर उपस्थित होणाऱ्या प्रश्नांना ती ट्विटरवरून प्रत्युत्तर देत आहे.

कंगनाच्या चित्रपटांविषयी बोलायचे झाले, तर ती लवकरच ‘थलायवी’ या चित्रपटात दिसणार आहे. तिचा हा चित्रपट याच महिन्यात प्रदर्शित होणार होता. परंतु कोरोना व्हायरसमुळे चित्रपट पुढे ढकलण्यात आला आहे. या चित्रपटातील एक गाणेही प्रदर्शित झाले आहे. त्याचे नाव ‘चली चली’ असे आहे.

हे देखील वाचा