बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन आपल्या आयुष्याचा ५० वा वाढदिवस साजरा करत आहेत. या खास दिवशी बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. मात्र या सगळ्यात सर्वात खास ठरली ती त्यांच्या पत्नी आणि माजी मिस वर्ल्ड ऐश्वर्या राय बच्चन यांची पोस्ट.
ऐश्वर्याने (Aishwarya)अभिषेकच्या लहानपणीचा एक गोड फोटो शेअर करत लिहिलं, “५०व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा माझ्या प्याऱ्या बेबी पापा. तुला भरपूर प्रेम, शांतता आणि आनंद लाभो. तू नेहमीच चमकत राहो आणि आनंदी राहो, हीच माझी प्रार्थना आहे.” ही पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे.
आज सकाळी बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी आपल्या ब्लॉगवरून अभिषेकसाठी शुभेच्छा पाठवणाऱ्या चाहत्यांचे आभार मानले. त्यांनी लिहिलं, “अभिषेकच्या ५०व्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देणाऱ्या सर्वांचे मी मनापासून आभार मानतो. तुमचे आशीर्वाद त्याला पुढे जाण्याची ताकद आणि धैर्य देतात. प्रेम आणि स्नेह.”
अभिषेकला बॉलिवूडमधील मित्र आणि सहकलाकारांकडूनही भरभरून शुभेच्छा मिळाल. अभिनेता जॅकी श्रॉफ यांनी ‘गुरु’ चित्रपटातील अभिषेकच्या आठवणी जागवणारा व्हिडीओ शेअर करत, “ढेर सारा प्यार” असं कॅप्शन दिलं.
कामाच्या बाबतीत बोलायचं झालं तर २०२५ मध्ये अभिषेक बच्चनच्या ‘हाउसफुल 5’ आणि ‘कालीधर लापता’ या दोन चित्रपटांनी प्रेक्षकांचे लक्ष वेधले. याच वर्षी झालेल्या ७०व्या फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यात अभिषेकने पहिल्यांदाच सर्वोत्कृष्ट अभिनेता (पुरुष) हा पुरस्कार पटकावला. हा सन्मान त्याला ‘I Want To Talk’ या चित्रपटासाठी मिळाला.
हा चित्रपट अर्जुन सेन नावाच्या एका बंगाली तरुणाची कथा सांगतो, जो अमेरिकन स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो. मात्र त्याला समजतं की त्याच्याकडे जगण्यासाठी फक्त १०० दिवस उरले आहेत, आणि या काळात तो आपल्या सात वर्षांपूर्वी दुरावलेल्या मुलीशी पुन्हा नातं जोडण्याचा प्रयत्न करतो.
आगामी काळात अभिषेक बच्चनचे ५ हून अधिक चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज असून, तो लवकरच पुन्हा मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. ५०व्या वाढदिवसानिमित्त चाहत्यांकडून त्याच्यावर शुभेच्छांचा आणि प्रेमाचा वर्षाव होत आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा










