Saturday, June 29, 2024

अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची ‘या’ दिवशी होणार सातवी आवृत्ती; एकदा वाचाच

जगभरातील सर्वोत्कृष्ट चित्रपट मराठवाड्यातील रसिकांपर्यंत पोहोचवणाऱ्या अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची सातवी आवृत्ती येत्या 3 ते 7 जानेवारी 2024 रोजी आयनॉक्स, प्रोझोन मॉल, छत्रपती संभाजीनगर येथे होणार आहे. या महोत्सवाचे आयोजन नाथ ग्रुप, महात्मा गांधी मिशन, यशवंतराव चव्हाण सेंटर जिल्हा केंद्र छत्रपती संभाजीनगर, मराठवाडा आर्ट कल्चर व फिल्म फाउंडेशन, एनएफडीसी व सांस्कृतिक कार्य विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात येत आहे.

या महोत्सवाच्या आयोजनामागील उद्देश म्हणजे आजपर्यंतचे जागतिक दर्जाचे सर्वोत्तम चित्रपट रसिकांपर्यंत पोहोचवणे, चित्रपट दिग्दर्शक, कलावंत व युवा पिढीतील सिनेमाची आवड असणाऱ्या कलाकारांना हक्काचे व्यासपीठ मिळून कला व तांत्रिक पातळीवर चित्रपटाचे रसग्रहण होत चित्रपटजाणिवा अधिक सशक्त व समृद्ध व्हाव्यात, मराठवाडा व छत्रपती संभाजीनगरचे नाव चित्रपटाच्या निर्मितीच्या अंगाने सांस्कृतिक केंद्र म्हणून व प्रोडक्शन हब म्हणून जागतिक पातळीवर पोहोचावे, छत्रपती संभाजीनगर शहरातील पर्यटन राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील पर्यटकांपर्यंत पोहोचावे, मराठवाडा विभागातील गुणवंत कलावंतांना चित्रपट दिग्दर्शक, चित्रपट विषयातील तज्ज्ञ व तंत्रज्ञांपर्यंत पोहोचता यावे, त्यांच्यासोबत संवाद साधता यावा तसेच आताचा मराठी सिनेमा राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत पोहोचावा, हा या महोत्सव आयोजनामागे उद्देश आहे.

या महोत्सवाच्या पाच दिवसांच्या कालावधीत भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे. महोत्सवात मागील वर्षाप्रमाणे भारतीय स्पर्धा गटाचा समावेश करण्यात आलेला आहे. यात विविध भारतीय भाषांतील नऊ सिनेमांचा समावेश असून पाच राष्ट्रीय पातळीवरील ज्युरी हे प्रेक्षकांसह चित्रपट पाहणार आहेत. यातील सर्वोत्त्कृष्ट भारतीय चित्रपटाला सुवर्ण कैलास पारितोषिक व एक लक्ष रूपये देण्यात येणार आहे. तसेच सर्वोत्कृष्ट पटकथा, सर्वोत्कृष्ट कलाकार (स्त्री/पुरुष) या वैयक्तिक पारितोषिकांचा देखील समावेश असणार आहे.

भारतीय सिनेमा स्पर्धा गट ज्युरी समितीचे अध्यक्ष ज्येष्ठ अभिनेते व दिग्दर्शक धृतीमान चॅटर्जी (कोलकाता) हे असणार आहे. तर ज्युरी सदस्य म्हणून प्रसिध्द छायाचित्रकार डिमो पापोव (झेक रिपब्लिक), ज्येष्ठ दिग्दर्शक नचिकेत पटवर्धन (पुणे), ज्येष्ठ समीक्षक रश्मी दोराईस्वामी (दिल्ली) व प्रसिध्द छायाचित्रकार हरी नायर (पणजी) हे मान्यवर असणार आहेत.

पुरस्कार वितरण सोहळ्यानंतर नवव्या अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव समारोपाची फिल्म म्हणून कान चित्रपट महोत्सवाची यावर्षीची सर्वोत्कृष्ट फिल्म अनॉटामी ऑफ फॉल (फ्रेंच) दाखविण्यात येणार आहे.Nमहोत्सवाच्या पाच दिवसांच्या कालावधीत चित्रपट प्रदर्शनांबरोबरच विविध भरगच्च कार्यक्रमांचे देखील आयोजन करण्यात आलेले आहे. गुरुवार, दि. 4 जानेवारी 2024 रोजी दुपारी 2 वाजता आयनॉक्स येथे पा, चिनी कम, घुमर, शामीताभ, पॅडमॅन या प्रसिध्द हिंदी चित्रपटांचे ‘दिग्दर्शक आर. बाल्की यांच्या मास्टर क्लासचे’ आयोजन करण्यात आलेले आहे.

महोत्सवाच्या निमित्ताने मराठवाड्यातील लघुपट निर्मिती करणाऱ्या कलाकारांसाठी शॉर्ट फिल्म स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले होते. या स्पर्धेला मराठवाड्यातील आठही जिल्ह्यातून मोठा प्रतिसाद लाभला. स्पर्धेतील अंतिम फेरीसाठी निवडलेल्या पाच शॉर्ट फिल्म महोत्सवादरम्यान दाखविण्यात येतील. या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट शॉर्ट फिल्मला विशेष पारितोषिक व रोख 25,000 रूपये देऊन गौरविण्यात येणार आहे. एमजीएम स्कूल ऑफ फिल्म आर्टसची प्रस्तुती अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातून पायाभरणी झालेल्या एमजीएम स्कूल ऑफ फिल्म आर्टसच्या विद्यार्थ्यांनी निर्मिती केलेल्या 9 लघुपटांचे व प्राचार्य रा. रं. बोराडे यांच्या पाचोळा या प्रसिध्द कादंबरीवर आधारित पाचोळा या चित्रपटाचे प्रदर्शनसुध्दा या महोत्सवादरम्यान करण्यात येणार आहे.

चित्रपट महोत्सवामध्ये जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवावा याकरिता औरंगाबाद शहरात पंचवीस महाविद्यालयांमध्ये चित्रपट रसग्रहण कार्यशाळांचे आयोजन चित्रपट समीक्षकांच्या उपस्थितीत दि. 20 डिसेंबर ते 2 जानेवारी दरम्यान करण्यात येणार आहे. चित्रपट महोत्सवास उपस्थित राहण्याकरीता प्रतिनिधी नोंदणीची सुरूवात करण्यात आलेली असून जगातील व देशातील सर्वोत्कृष्ट सिनेमे रसिकांना बघता यावे, याकरीता सर्वसामान्य नागरिकांकरीता केवळ पाचशे पन्नास रुपये कॅटलॉग शुल्क आकारण्यात येणार आहे, तर ज्येष्ठ नागरिक व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना सवलतीच्या दरात केवळ तीनशे पन्नास रुपयांत या महोत्सवाचा आनंद घेता येणार आहे.

प्रतिनिधी नोंदणी सुरुवात झाली असून www.aifilmfest.in या वेबसाईट वर चित्रपट रसिकांना ऑनलाईन प्रतिनिधी नोंदणी करता येईल तर प्रत्यक्ष नोंदणी साकेत बुक वर्ल्ड (औरंगपुरा), तापडीया आयनॉक्स (सिडको), आयनॉक्स-रिलायन्स मॉल, आयनॉक्स-प्रोझोन मॉल व निर्मिक ग्रुप, व्यंकटेश मंगल कार्यालयासमोर, सुतगिरणी रोड येथे करता येईल. छत्रपती संभाजीनगरचे नाव चित्रपट क्षेत्रात जागतिक व्यासपीठावर नेणाऱ्या या महोत्सवात जास्तीत जास्त रसिकांनी सहभाग नोंदवावा तसेच अधिक माहितीसाठी www.aifilmfest.in या वेबसाईटवर तसेच info@aifilmfest.in या ई-मेल आयडीवर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. (Ajantha Verul International Film Festival )

आधिक वाचा-
Rhea Chakraborty: अभिनेत्री रिया चक्रवर्तीला CBI कडून ‘लूक आऊट’ नोटीस; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
‘अ‍ॅनिमल’मधील ‘जमाल जमालो कुडू’ गाण्याची नारकर जोडप्याला भूरळ; व्हिडिओ पाहून नेटकरी म्हणाले…

हे देखील वाचा