अजय-काजोल पासून ते रितेश-जेनेलिया पर्यंत ‘या’ आहेत रील आणि रियल लाईफ जोड्या


असं म्हणतात की, लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधल्या जातात. हे जरी सत्य असले तरी बॉलिवूडच्या काही जोड्या मात्र चित्रपटांच्या निमित्ताने बांधल्या गेल्या. हो, चित्रपटात एकत्र काम करत असताना रील लाईफ असणाऱ्या काही जोड्या रिअल लाईफमध्ये तयार झाल्या. बॉलिवूडमध्ये चित्रपटांसोबत त्या सिनेमातल्या मुख्य जोडीची देखील तितकीच चर्चा होत असते. अगदी ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे मधले राज – सिमरन’ असो किंवा ‘हम आपके हैं कौन मधले प्रेम – निशा’ यासर्वच जोडया पडद्यावर तुफान हिट झाल्या. मात्र अशा सुद्धा काही जोड्या आहेत ज्या पडद्यासोबतच खऱ्या आयुष्यात देखील तयार झाल्या. आज या लेखातून आम्ही तुम्हाला अशाच काही जोड्या सांगणार आहोत, ज्या रील लाईफ सोबत रिअल लाईफमध्ये सुद्धा हिट झाल्या.

रणवीर सिंग – दीपिका पदुकोण
रणवीरनं एका मुलाखतीत दीपिकाला २०१२ मध्ये एका पुरस्कार सोहळ्यात पहिल्यांदा पाहिले आणि तो पाहताक्षणी तिच्या प्रेमात पडला असं त्यानं सांगितलं होतं. दीपिका आणि रणवीर यांनी संजय लीला भन्साळी यांच्या ‘गोलियां की रसलीला … रामलीला’ या चित्रपटात पहिल्यांदाच एकत्र काम केलं. याच चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान दोघांमध्ये काहीतरी सुरू असल्याच्या चर्चांना सुरुवात झाली. ६ वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर या दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला. त्यांनी १४ नोव्हेंबर २०१८ मध्ये इटलीतील ‘लेक कोमो’ इथल्या व्हिला डेल बालबियानेलो या ठिकाणी लग्नगाठ बांधली. या दोघांनी पारंपरिक कोंकणी पद्धतीनं आणि सिंधी पद्धतीनं विवाह केला. त्यांनी आतापर्यंत रामलीला, बाजीराव मस्तानी आणि पद्मावती या सिनेमात एकत्र काम केले आहे.

अजय देवगन – काजोल
अजय आणि काजोल यांची पहिली भेट १९९५ मध्ये आलेल्या ‘हलचल’ चित्रपटादरम्यान झाली. त्यानंतर त्यांच्या भेटी वाढू लागल्या, मैत्रीचा टप्पा ओलांडल्यानंतर त्यांनी १९९९ साली महाराष्ट्रीयन पद्धतीने लग्न केले. आज त्यांच्या लग्नाला २१ वर्ष पूर्ण झाले असून त्यांना न्यासा आणि युग नावाची दोन मुले आहेत. याचवर्षी या दोघांचा ‘तानाजी द अनसंग हिरो’ चित्रपट प्रदर्शित झाला होता. हा सिनेमा सुपरडुपर हिट झाला.

करीना कपूर – सैफ अली खान
बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय कपल म्हणून ‘सैफिना’ कडे पहिले जाते. ‘टशन’ चित्रपटाच्या सेटवर करीना आणि सैफची पहिली भेट झाली. त्यानंतर त्यांनी ‘कुर्बान’ सिनेमात एकत्र काम केले २०१२ साली या दोघांनी लग्न केले. यांना तैमूर नावाचा एक मुलगा असून करीना लवकरच दुसऱ्यांदा आई होणार आहे.

ऐश्वर्या राय – अभिषेक बच्चन
बॉलिवूडमधील पॉवरफुल कपल म्हणून या दोघांकडे पाहिले जाते. अभिषेक ऐश्वर्याने ‘ढाई अक्षर प्रेम के’ आणि ‘कुछ न कहो’ यांसारख्या सिनेमात आधी काम केले होते. मात्र ‘गुरु’ आणि ‘उमरावजान’ सिनेमाच्या दरम्यान हे दोघे जवळ आले. एप्रिल २००७ मध्ये यांनी लग्न केले. यांना आज आराध्या नावाची मुलगी आहे.

कुणाल खेमू – सोहा अली खान
सोहा आणि कुणाल यांची भेट २००९ मध्ये ‘ढूंढते रह जाओगे’ सिनेमाच्या सेटवर झाली. तीन वर्षे डेट केल्यानंतर आणि लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर त्यांनी जानेवारी २०१५ मध्ये लग्न केले. जवळच्या लोकांच्या उपस्थितीत अगदी सध्या पद्धतीने लग्न केले. या दोघांना इनाया नावाची मुलगी आहे.

रितेश देशमुख – जेनेलिया डिसुझा
२००३ मध्ये ‘तुझे मेरी कसम’ सिनेमा करताना यांची पहिली भेट झाली. त्यानंतर त्यांनी अनेक सिनेमात काम केले. १० वर्ष रिलेशनशिप मध्ये राहिल्यानंतर २०१२ मध्ये यांनी लग्न केले. या दोघांना दोन मुलं आहेत.

आमचा टेलीग्राम चॅनेल येथे क्लिक करुन जॉईन करा.


Leave A Reply

Your email address will not be published.