बॉलिवूड कलाकारांप्रमाणेच दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील कलाकारही प्रचंड लोकप्रिय आहेत. दक्षिणेमध्ये कलाकारांना देवाप्रमाणे मानले जाते.अगदी चित्रपट रिलीझ होण्यापुर्वीपासूनच आपल्या लाडक्या कलाकारांबद्दल चाहत्यांना सर्वकाही माहित असतं. कधी कधी हे चाहते आपल्या लाडक्या अभिनेत्याच्या चित्रपटाच्या पोस्टरचा अभिषेकही घालतात. अनेक अभिनेत्यांना तिकडे देव मानले जाते हे आपल्याला नक्कीच नविन नाही. अशाच या इंडस्ट्रीतील एक सुपरस्टार म्हणजे अभिनेता अजित कुमार
तामिळ सिनेमातील मोठं नाव असलेल्या अजितने नुकताच आपला ५० वा वाढदिवस साजरा केला आहे. त्याचा जन्म १ मे १९७१ रोजी सिकंदराबाद, हैदराबाद येथे झाला होता. अजित कुमार याचे वडील तमिळ, तर आई बंगाली आहेत. अजित याने आपल्या चित्रपटात अनेक जबरदस्त भुमिका साकारल्या आहेत. दक्षिणेत अजित याची लोकप्रियता अशी आहे की, त्याचे चित्रपट प्रदर्शित होताच संपुर्ण दक्षिण भारतीय चित्रपटगृहं व मल्टीप्लेक्स गर्दीने भरून जातात. यावरूनच आपल्याला समजू शकते की, त्याची लोकप्रियता किती आहे ते. चला तर मंडळी अशाच या खास अभिनेत्याच्या ५०वर्षातील खास प्रवासाबद्दल आज आपण जाणून घेऊयात.
अजितकुमार याला दक्षिणेत प्रेमाने थाला अजित म्हणतात. थाला शब्दाचा अर्थ नेता असा होतो. कमल हसन, आमिर खान आणि हृतिक रोशन सारख्या इतर सुपरस्टार्सप्रमाणे त्यानेही आपल्या करिअरची सुरुवात बालवयातच केली होती. अनेक चित्रपटांमध्ये अजितने बालकलाकाराची भूमिका केली होती.
१९९०मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘एन विदू एन कानावर’ या तमिळ चित्रपटाच्या एका गाण्यामध्ये अजित दिसला होता, ज्यात त्याने एका शालेय विद्यार्थ्याची छोटी भूमिका साकारली होती. १९९२ मध्ये प्रदर्शित झालेला प्रेमा पुष्पकम या चित्रपटात अजितने काम केले होते. हा त्याने संपुर्ण कारकिर्दीत काम केलेला एकमेव तेलूगू सिनेमा होता. या चित्रपटाचे शुटिंग सुरु असतानाच दिग्दर्शकाचा मृत्यू झाला होता. यामुळे या चित्रपटाचे दिग्दर्शकाच्या वडिलांनी चित्रपटाचे राहिलेले काम केले होते. अजित याचा पहिला तमिळ चित्रपट १९९३ मध्ये प्रदर्शित झालेला ‘अमरावती’ हा होता. तेव्हा अजित केवळ २२ वर्षांचा होता.
आणखी एक मनोरंजक किस्सा अजितशी संबंधित आहे. त्याचे दोन चित्रपट हे चक्क दुसर्या सुपरस्टारने डब केलेले आहेत आणि गमतीचा भाग म्हणजे तो सुपर स्टार दुसरा तिसरा कुणी नसून विक्रम होता. विक्रम त्यावेळी संघर्ष करत होता. त्याने अजित याच्या ‘अमरावती’ आणि ‘पसमलारगल’ सिनेमांमध्ये डबिंग केले होते. यानंतर दोघांनी ‘उल्लासम’ नावाच्या चित्रपटात एकत्र काम देखील केले आहे.
‘राजाविन परवैयले’ चित्रपटात अजित आणि अभिनेता विजय एकत्र दिसले होते. या चित्रपटात थाला एका छोट्या भूमिकेत होता. त्याने विजयच्या मित्राची भूमिका केली होती. यानंतर ते पुन्हा वसंतच्या ‘नेर्रुकु नेर’ चित्रपटात एकत्र काम करताना दिसले. विजय त्याने १८ दिवस शूट केले होते, परंतु तारखेच्या कारणामुळे अजित चित्रपटातून बाहेर पडला होता. त्यानंतर सूर्या याला त्याच्या जागी चित्रपटात घेण्यात आले.
चेन्नई येथे एका कार्यक्रमात शाहरुख खानने अजितविषयी बोलताना म्हटले होते की, त्याचे सह-कलाकार किती मोठे सुपरस्टार्स आहेत, याची त्याला कल्पना नव्हती. शूटच्या वेळी अजित हे अगदी साधे रहायचे.’ या दोन्ही कलाकारांनी अशोका चित्रपटात काम केले आहे. अजितने केलेला हा एकमेव हिंदी सिनेमा आहे.
अजित कुमार याने २४ एप्रिल २००० रोजी ‘अमरकमल’ चित्रपटाची सहकलाकार शालिनीशी लग्न केले आहे. शालिनी ही दक्षिण चित्रपटांतील प्रसिद्ध अभिनेत्रीही आहे. त्यांना दोन मुलेही आहेत. मुलाचे नाव अद्विक आणि मुलीचे अनुष्का आहे.
शाळा सोडल्यानंतर त्याने, अनेक स्पर्धांमध्ये सहभाग घेतला होता. अजित कुमारने कार रेसिंगमध्येही अनेक वेळा भाग घेतला आहे. एवढंच नाही तर यात त्याने घवघवीत यश प्राप्त केले आहे. अभिनय आणि कार रेसिंग व्यतिरिक्त तो लढाऊ विमानं चालवणारा ट्रेंड पायलट देखील आहे. अजितने स्वतः घरीच विमानाचे मॉडेल बनवले आहे. अजितला बाईक फार आवडतात. त्याच्याकडे बाईकचा चांगला मोठा संग्रह आहे.