‘कुंवारी आपने छोड़ा नहीं और श्रीमती किसी ने बनाया नहीं’, म्हणत गंगुबाई काठियावाडीचा पहिला टिझर रिलीझ


मागच्या अनेक महिन्यांपासून ‘गंगूबाई काठियावाडी’ या सिनेमाबद्दल सर्वानाच खूप उत्सुकता होती. सर्वोत्कृष्ट आणि प्रभावी दिग्दर्शक असणारे संजय लीला भन्साळी आणि सर्वोत्कृष्ट अभिनेत्री असणारी आलिया भट्ट, या दोन कमाल व्यक्ती या सिनेमाच्या माध्यमातून एकत्र आल्या आहेत. सिनेमाची घोषणा झाल्यापासूनच हा सिनेमा सर्वांच्याच चर्चेचा विषय ठरत होता. ‘गंगूबाई काठियावाडी’ चित्रपट वादामध्ये सुद्धा अडकला होता. आता मात्र सर्व सुरळीत झाल्यानंतर या सिनेमाचा टिझर सर्वांसमोर आला आहे.

संजय लीला भन्साळी यांच्या वाढदिवसाचे मुहूर्त साधत ह्या बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित ‘गंगुबाई काठियावाडी’ चित्रपटाचा दमदार टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटात अभिनेत्री आलिया भट्ट मुख्य भूमिकेत आहे. दीड मिनिटांच्या या टीझरमध्ये आलियाचा दमदार आणि हटके अंदाज सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. या चित्रपटातून आलियाचा अतिशय वेगळा अंदाज सर्वांना पाहायला मिळणार आहे. शिवाय टीझरमधील संवाददेखील लक्षात राहत आहेत. या सिनेमातून मुंबईतील रेट लाईट एरिया म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कामाठीपुरात दबदबा असणाऱ्या ‘गंगूबाई’ची कथा दाखवण्यात आली आहे.

आलियाची दमदार चाल, तिचा अंदाज, तिची बॉडीलँग्वेज आणि करडी नजर लक्षवेधून घेत आहे. आलिया भट्टने सोशल मीडियावर हा टीझर शेअर करत दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. आलियाने लिहिले, “ तुमचा वाढदिवस साजरा करण्याचा यापेक्षा चांगला आणि वेगळा मार्ग असूच शकला नसता. मी माझ्या हृदयाचा आणि आत्म्याचा एक भाग तुमच्या समोर सादर करत आहे. भेटा गंगूला!” असे शीर्षक देत आलियाने संजय लीला भन्साळी यांना शुभेच्छा दिल्या आहेत. अवघ्या काही तासातच आलियाने शेअर केलेल्या व्हिडीओला दोन लाखांहून अधिक लाईकस् मिळाले आहेत. तर अनेकांनी आलियाचे कौतुक केलेय.

चित्रपटाच्या पोस्टरमध्ये आलिया भट्ट अगदी हटके लूकमध्ये दिसली. संजय लीला भन्साळी यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. हा चित्रपट हुसैन जैदी यांच्या ‘माफिया क्विन ऑफ मुंबई’ या पुस्तकावर आधारित आहे. तर चित्रपटात आलिया भट्ट गंगूबाईची मुख्य भूमिका साकारत आहे. त्याचसोबत अजय देवगण आणि विक्रांत मेसी यांची महत्वाची भूमिका चित्रपटात आहे.


Leave A Reply

Your email address will not be published.