बॉलिवूडमधील अनेक हिट गाण्यांचा संगीतकार अमाल मलिक अलीकडे बिग बॉस 19 मुळे चांगलाच चर्चेत आहे. या शोदरम्यान त्याने आपल्या कुटुंबापासून ते संगीत प्रवासापर्यंत अनेक गोष्टी उघडपणे मांडल्या. आता अमालने एक धक्कादायक खुलासा करत सांगितले आहे की, प्रसिद्ध ‘मलिक’ सरनेममुळेच त्याला अनेकदा काम गमवावे लागले.
एका दिलेल्या मुलाखतीत अमाल मलिकने सांगितले की, त्याचे कौटुंबिक नाव अनेकदा मदतीऐवजी संशयाचे कारण ठरले.तो म्हणाला, “जिथेही मला असिस्टंट म्हणून काम मिळायचे, तिथे माझा आडनाव ‘मलिक’ (Malik)असल्याचे कळताच मला कामावरून काढले जायचे. ‘हा त्या कुटुंबातील आहे, आमचं संगीत विकू शकतो’ अशी समजूत करून घेतली जायची.” अमालने पुढे सांगितले की, याचा फटका त्याला आणि त्याचा भाऊ, गायक अरमान मलिक, दोघांनाही बसला.
आपल्या सुरुवातीच्या दिवसांबद्दल बोलताना अमालने 15 ते 25 वयोगटातील काळ हा आयुष्यातील सर्वात कठीण पण निर्णायक असल्याचे सांगितले. तो म्हणाला, “या वयात मी जे काही अनुभवलं, ते लोक कदाचित वेगळ्या टप्प्यावर पाहतात. पण माझ्यासाठी हे सगळं चांगलंच होतं, कारण हे संघर्ष, अडचणी आणि अडथळे आयुष्याच्या सुरुवातीलाच आले.”
या अनुभवांमुळे आपण अधिक मजबूत, लवचिक आणि सकारात्मक दृष्टिकोन असलेला माणूस बनल्याचे अमालचे मत आहे.
अनेक सुपरहिट गाणी दिल्यानंतरही अपेक्षित तेवढी ओळख मिळाली नाही, अशी खंत अमाल मलिक व्यक्त करतो. बिग बॉस 19 मधील त्याच्या प्रवासातही त्याने आपल्या वैयक्तिक आयुष्यावर, कुटुंबाशी असलेल्या गुंतागुंतीच्या नात्यांवर आणि संघर्षाच्या काळावर मोकळेपणाने भाष्य केले. त्यामुळेच सध्या अमाल मलिक पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा










