अमेझॉन प्राईमने २६ नोव्हेंबरचं औचित्य साधून मार्च २०२१ मध्ये येऊ घातलेल्या मुंबई डायरीज या वेबसिरीजचा टिझर युट्युब वर प्रदर्शित केला. ही वेबसिरीज आठ भागांची मालिका असणार आहे. २६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्यावर आधारलेली आहे.
या टिझरमध्ये २६/११ च्या हल्ल्यात डॉक्टरांची काय परिस्थिती होती, त्यांनी ह्या दहशतवाद्यांना कसं तोंड दिलं यावर भाष्य केलं असल्याचं पाहायला मिळत आहे. निखिल अडवाणी दिग्दर्शित या वेबसिरीजमध्ये कोंकणा सेन शर्मा, टीना देसाई, मोहित रैना, श्रेया धन्वंतरी इत्यादी कलाकार मुख्य भूमिका साकारताना पाहायला मिळणार आहेत.
मुंबई डायरीज ही वेबसरीरीज २६/११ च्या हल्ल्यात अडकलेले डॉक्टर्स, नर्सेस, पॅरामेडिकल कर्मचारी आणि रुग्णालयीन कर्मचारी ज्यांनी तहान,भूक, थकवा यांची तमा न बाळगता ज्या प्रकारे रुग्णांची सेवा केली, अनेकांचे प्राण वाचवले याची कथा आहे. ही वेबसिरीज मार्च २०२१ मध्ये अमेझॉन प्राईम या ओटीटी प्लॅटफॉर्म वर प्रदर्शित होणार आहे. या वेबसिरीजची निर्मिती निखिल अडवाणी आणि एमए ऐंटरटेमेंट यांनी केली असून मालिकेचं दिग्दर्शन निखिल अडवाणी आणि निखिल गोंसालविस यांनी केले आहे.
या वेबसिरीजचे दिग्दर्शक निखिल अडवाणी माध्यमांशी बोलताना म्हणाले, “आम्ही जेव्हा त्या भयावह हल्ल्याचा विचार करतो तेव्हा त्या रात्री आम्ही कुठे आणि कसे होतो याचा विचार करतो. आज पर्यंत २६/११ च्या हल्ल्यावर खूप सिनेमे आणि इतर कलाकृती आल्या परंतु त्यामध्ये कुठेच डॉक्टरांची बाजू मांडण्यात आलेली नव्हती. या मालिकेच्या माध्यमातून आम्ही डॉक्टर्स आणि वैद्यकीय अधिकारी तसेच कर्मचारी यांनी त्या क्षणी जी भूमिका बजावली, मानसिकरित्या ज्या पद्धतीने त्यांनी ती परिस्थिती हाताळली यावर भाष्य केलं आहे.”
मुंबई डायरीज २६/११ वेबसिरीजच्या या टिझरला युट्युबवर आतापर्यंत सहा लाखांहून अधिक व्ह्यूज तर एकवीस हजारांपेक्षा जास्त लाईक्स आल्या आहेत. तर अनेकानी कंमेंट बॉक्स मध्ये या सिरीजचं कौतुक करत वेबसिरीज पाहण्यासाठी उत्सुक असल्याचे म्हटले आहे.