Friday, July 5, 2024

‘…तर कानाखाली आवाज काढण्यात येईल!’ आदित्य नारायणच्या वादग्रस्त वक्तव्यावर अमेय खोपकरांची आगपाखड

‘इंडियन आयडल’ हा शो आजकाल बराच चर्चेत आहे. चर्चेत म्हणण्यापेक्षा वादात म्हणले, तर ते चुकीचे ठरणार नाही. अलीकडेच, किशोर कुमार यांचा मुलगा अमित कुमार शोमध्ये पाहुणे म्हणून आले होते. शोमधून बाहेर पडल्यानंतर त्यांनी शोबद्दल बरेच खुलासे केले आणि तेव्हापासूनच हा शो वादाच्या भोवऱ्यात सापडत चालला आहे. अमित कुमार यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देणाऱ्या आदित्य नारायणलाही या दरम्यान खूप ट्रोल करण्यात येत आहे.

‘इंडियन आयडल १२’चा होस्ट आदित्य नारायणचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामुळे त्याच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. खरं तर या व्हिडिओमध्ये तो एका बॅक स्टेज आर्टिस्टला अलिबागवरून बोलताना दिसत आहे. आता यावर महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी संताप व्यक्त केला आहे. रागात त्यांनी आदित्यला धमकीच दिली, असे म्हणणे वावगे ठरणार नाही.

https://www.facebook.com/ameya.khopkar/videos/10160944223995550/?t=277

अमेय खोपकर यांनी फेसबुक लाईव्हवर एक व्हिडिओ शेअर करत, त्यांचा राग व्यक्त केला आहे. या व्हिडिओमध्ये ते म्हणाले, “मी आदित्य नारायणचा एक व्हिडिओ पाहिला. या व्हिडिओमध्ये तो एका व्यक्तीवर संतापला आणि म्हणाला की, मी काय अलिबागवरुन आलो आहे का? त्याचे असे बोलणे आम्हाला खटकलं आहे. अलिबागची लोकं तुम्हाला इतकी मुर्ख वाटतात का? त्याने आत्ताच्या आत्ता याबाबत माफी मागावी. मी त्याच्या वडिलांसोबतही बोललो आहे आणि जर त्याने माफी मागितली नाही, तर त्याच्या कानाखाली आवाज काढून परिस्थितीचं गांभीर्य लक्षात आणून दिलं जाईल. यापुढे जर अलिबागबद्दल असे आक्षेपार्ह वक्तव्य केले, तर तिथे तुमचे एकही चित्रीकरण करु दिले जाणार नाही. यापुढे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेशी तुमची गाठ आहे.”

आदित्य नारायण हा प्रसिद्ध गायक उदित नारायण यांचा मुलगा आहे. तोही गायकी करतो, परंतु या क्षेत्रात त्याला अपेक्षेनुसार यश मिळू शकले नाही. आदित्यने बऱ्याच रियॅलिटी शोमध्ये सहभाग घेतला आहे. यावेळी तो ‘इंडियन आयडल १२’मध्ये होस्टची भूमिका बजावताना दिसत आहे. महत्त्वाचे म्हणजे, अमेय खोपकरांच्या या धमकीवजा वक्तव्यावर अद्याप आदित्यने आपली प्रतिक्रिया दिलेली नाही.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हे देखील वाचा