Tuesday, July 9, 2024

‘आमचे कपडे बदलण्यापेक्षा तुमचे विचार बदला’, अमिताभ बच्चन यांच्या नातीने साधला उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांवर निशाणा

अमिताभ बच्चन यांची नात नव्या बॉलिवूडपासून जरी दूर असली, तरीही तिची स्टाईल आणि तिच्या सौंदर्याचे लाखो चाहते आहेत. नव्याने खास स्टाईलच्या जोरावर चाहत्यांमध्ये तिची एक वेगळी ओळखही निर्माण केली आहे. पण आजकाल नव्या तिच्या स्टाईलसाठी नव्हे तर तिच्या स्पष्ट वक्तव्यामुळे चर्चेत आहे. ती समाजातील विचारांबद्दल ज्या प्रकारे बोलली आहे, त्यावरून स्पष्ट दिसून येते की ती बरीच धाडसी आणि निर्भीड आहे. अलीकडेच, नव्याने उत्तराखंडचे मुख्यमंत्री तीरथसिंग रावत यांच्यावर रोष व्यक्त केला आहे, कारण त्यांच्या म्हणण्यानुसार रीप्ड जीन्स अर्थात फाटलेल्या जीन्सची स्टाईल समाजासाठी अत्यंत वाईट आहे.

नव्या नंदा अमिताभ बच्चन यांची मुलगी श्वेता नंदाची मुलगी आहे. नव्या बर्‍याचदा तिचे आजोबा बिगबींसोबत फोटो शेअर करत असते. त्याचवेळी, अमिताभ देखील आपल्या नातीवर खूप प्रेम करतात. अशा परिस्थितीत नव्या या दिवसात तिच्या प्रतिक्रियेमुळे खूप चर्चेत आली आहे.

नुकतेच देहरादून येथे एका कार्यक्रमात उत्तराखंडचे मुख्यमंत्री तीरथसिंग रावत म्हणाले, की रीप्ड जीन्स आपल्या समाजातील विघटनासाठी मार्ग प्रशस्त करीत आहे. मुख्यमंत्र्यांनी महिलांच्या ड्रेसवर केलेल्या या वक्तव्यामुळे लोकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. मुली आता रीप्ड जीन्ससह फोटो सोशल मीडियावर शेअर करत आहेत.

यावर नव्यानेही संताप व्यक्त केला आहे. “कपडे बदलण्यापूर्वी आपली मानसिकता का बदलू नये,”असे नव्याने म्हटले आहे. एवढेच नव्हे तर नव्याने मुख्यमंत्र्यांनाही प्रश्न केला आहे की, “मुख्यमंत्री स्वत: योग्य वातावरण देऊ शकतील का?” याशिवाय तिने दमदार अंदाजात सांगितले आहे की, “मी माझी रीप्ड जीन्स घालणार. धन्यवाद, आणि मी ती अभिमानाने घालीन.”

तरुण महिलांच्या निवडीबद्दल भाष्य करताना मुख्यमंत्री म्हणाले की, “एक स्वयंसेवी संस्था चालवणाऱ्या महिलेला रीप्ड जीन्स परिधान केलेली पाहून मला धक्का बसला. अशी महिला समाजातील लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी समाजातील लोकांना भेटली, तर ती समाजात कोणता संदेश देत आहे? हे सर्व घरातून सुरू होते. आपण जे काही करतो तेच आपली मुलं शिकतात. जर मुलांना घरी योग्य संस्कृती शिकवले गेले तर ते कितीही आधुनिक झाले, तरी आयुष्यात कधीच अपयशी ठरू शकत नाहीत.”

हे देखील वाचा