‘बिग बी’ म्हणून ओळखले जाणारे अमिताभ बच्चन यांचं वय ७९ आहे. वयाची सत्तरी ओलांडूनही ते चॅलेंजिंग सिनेमात काम करतायत. मात्र, मंडळी एकेकाळी यापेक्षा फिट असलेले बिग बींची तब्येत खूपच गंभीर झाली होती. त्यांच्यावर मोठ्या रुग्णालयात उपचार करण्यात आले होते, पण अमिताभ यांची तब्येत इतकी बिघडली होती की, डॉक्टरांनीही त्यांची पत्नी जया बच्चन यांना सांगितलं होतं की, अमिताभ यांचा मृत्यू होण्यापूर्वी त्यांना शेवटचं भेटून घ्या. काय होता तो किस्सा? कशामुळं बिघडली होती अमिताभ बच्चन यांची तब्येत? आणि कशाप्रकारे अमिताभ मृत्यूशी झुंज देऊन पुन्हा कसे परतले चला जाणून घेऊया…
हा किस्सा होता २२ जुलै, १९८२ रोजी कर्नाटकची राजधानी बंगळुरूपासून १६ किलोमीटर दूर शूट होत असलेल्या ‘कुली’ या सिनेमावेळीचा. एका फायटिंग सीनचं शूटिंग सुरू होतं. यावेळी अभिनेते पुनीत इस्सर यांना अमिताभ बच्चन यांना उचलून वर फेकायचं होतं, पण ते गणित बिघडलं. म्हणजे एखादा सेकंद इकडं-तिकडं झाला असेल, आणि बिग बी चुकीच्या ठिकाणी आपटले. या गोंधळात दोन गोष्टी एक सोबत घडल्या. पहिली म्हणजे पुनीत इस्सर यांची बुक्की फक्त बिग बींच्या पोटाला स्पर्श करणार होती, पण ती एकदम जोरात लागली, आणि दुसरी गोष्ट म्हणजे, शेजारीच पडलेल्या टेबलच्या कोपरावर आपटल्यामुळं त्यांच्या पोटाला खूप जोरात दुखापत झाली. या घटनेनंतर तडकाफडकी अमिताभ शूटिंग बंद करून हॉटेलवर गेले.
पण, जसजसा वेळ जाऊ लागला, त्यांना होणारा त्रास बळावू लागला. काही तासांच्या आतच त्यांची तब्येत अशी झाली की, त्यांना थेट हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करावं लागलं. सर्वात आधी त्यांना बंगळुरूच्या सेंट फिलोमेनाज हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात आलं, पण तिथूनही त्यांना लगेच मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात नेण्यात आलं. आठ दिवसांत त्यांच्या दोन सर्जरी करण्यात आल्या. तरीही त्यांची तब्येत सुधारली नाही.
रुग्णालयात त्यांच्यावर त्यांच्यावर उपचार झाले, पण त्यांची बिघडत चाललेली तब्येत पाहून डॉक्टरांनाही वाटलं ते मेल्यातच जमा आहेत. अमिताभ कोमात गेले होते. डॉक्टरांनी त्यांची पत्नी जया बच्चन यांना सांगितलं की, “बच्चन यांची तब्येत खूपच खराब झाली आहे. तुम्ही त्यांना शेवटचं भेटून घ्या.” जया ताबडतोब अमिताभला भेटायला आत गेल्या. डॉक्टरांनी सांगितलं होतं की, अमिताभ यांच्या शरीरात कोणतीही हालचाल होत नाही, पण जया यांनी अचानक पाहिलं, तर अमिताभ यांच्या पायाचं बोट हलत आहे. या घटनेनंतर डॉक्टरांनीही लगेच पुढील उपचार सुरू केले. अमिताभ यांचे प्राण वाचले. दरम्यान, जया बाहेर आल्या आणि त्यांना जाणवलं की, हा देवाचाच काहीतरी चमत्कार आहे.
या घटनेच्या ३३ वर्षांनंतर आपल्या चाहत्यांचं आभार मानत अमिताभ यांनी २०१५ साली या अपघाताचा उल्लेख आपल्या ब्लॉकमध्ये केला होता. २ ऑगस्ट, २०१५ साली लिहिलं होतं की, “२ ऑगस्ट, १९८२ रोजी ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये माझ्या आयुष्यावरील ढग आणखीच काळे झाले. मी जीनव- मृत्यूच्या मध्येच अडकलो होतो. काही दिवसांच्या आत झालेल्या दुसऱ्या सर्जरीनंतर मी खूप काळ शुद्धीत नव्हतो. जयाला माझा मृत्यू होण्याच्या आधी मला पाहण्यासाठी आयसीयूत पाठवण्यात आलं. परंतु डॉक्टर उदवाडिया यांनी एक शेवटचा प्रयत्न केला. त्यांनी एकापाठोपाठ एक अनेक कॉर्टिसन इंजेक्शन लावले. यानंतर जसा काय चमत्कारच झाला. माझ्या पायाचा अंगठा हलला. हे सर्वात आधी जयानं पाहिलं आणि ती ओरडली, ‘पाहा ते जिवंत आहेत.'”
अमिताभ यांना शुद्ध तर आली होती, पण त्यांना आपल्या घरी पोहोचण्यासाठी आणखी २ महिन्यांहून अधिक काळ लागला. ते २४ सप्टेंबर, १९८२ रोजी एंबेसेडर कारमधून आपल्या घरी पोहोचले. ते सांगतात की, हा त्यांच्या आयुष्यातील पहिला क्षण होता, जेव्हा त्यांनी वडील डॉ. हरिवंशराय बच्चन यांना रडताना पाहिलं होतं. आपल्या मुलाला मृत्यूच्या तोंडातून परत येताना पाहून हरिवंशराय बच्चन आपल्या डोळ्यातलं पाणी रोखू शकले नाही. गाडीतून उतरताच अमिताभ यांनी आपल्या रडणाऱ्या वडिलांना जोराची झप्पी दिली. ती खरंच जादूची झप्पी होती.
दिनांक २४ सप्टेंबर, १९८२ रोजी अमिताभ आपल्या घरी पोहोचले आणि त्याच्या ठीक ३७ वर्षांनंतर त्यांना त्याच तारखेला भारतीय सिनेसृष्टीतील सर्वात मोठा सन्मान दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्याची घोषणाही झाली.
कूलीनंतर अमिताभ यांनी ‘शराबी’, ‘गिरफ्तार’, ‘मर्द’, यांसारख्या हिट सिनेमांसोबतच १०० हून अधिक सिनेमात काम केलं.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘मी हिंदुस्तानी मुलगी…’, म्हणत लंडनच्या थेटरात किस करू पाहणाऱ्या परदेशी अभिनेत्याला सुनावणारी निम्मी
जगाला वेड लावणाऱ्या ‘हॅरी पॉटर’मधील कलाकार सध्या काय करतात? एका क्लिकवर मिळेल माहिती
रोमान्स एकासोबत अन् लग्न दुसऱ्यासोबत, ‘या’ कलाकारांना काळजावर दगड ठेवत संपवावे लागले नाते