Saturday, July 6, 2024

मैत्रिणीच्या बर्थडेला गेली अन् तिच्या भावाला पाहून अमृताचीच विकेट पडली! जाणून घ्या तिची लव्ह स्टोरी आणि पतीबद्दल

सध्या हिंदी आणि मराठी चित्रपट सृष्टीमध्ये सध्या लग्नाचा माहौल सुरू आहे. दर काही दिवसांनी कुठला ना कुठला सेलिब्रिटी विवाहबंधनात अडकल्याची खबर आपल्यापर्यंत पोहोचतंच असते. जानेवारी २०२१ मध्ये तर अनेक मराठी आणि हिंदी सेलिब्रिटी लग्नाच्या या हव्या हव्याश्या वाटणाऱ्या बेडीत अडकणार आहेत.

पुढील वर्षी याच महिन्यात या सर्व सेलिब्रिटींच्या लग्नाचे वाढदिवस येतील. याच प्रमाणे याही वर्षी या महिन्यात अनेक कलाकारांच्या ऍनिव्हर्सरीज देखील असणार आहेत. अशाच एका सुप्रसिद्ध सेलिब्रिटी जोडप्याची काही दिवसांपूर्वी रिलेशनशिप ऍनिव्हर्सरी झाली. ते जोडपं आहे अमृता सुभाष आणि संदेश कुलकर्णी!

काहींसाठी संदेश ओळखीचा असेल तर काहींसाठी ओळखीचा नसेल परंतु एकदा का त्याची ओळख पटली की आपण त्याला विसरणं शक्य नाही. अभिनेत्री अमृता सुभाषने ट्विटर वर एक व्हिडिओ शेअर करत २६ वर्षांपूर्वी काय घडलं होतं हे सांगितलं आहे. चला तर मग मंडळी आपण या दोघांची जी भारी लव्हस्टोरी आहे ती पाहुयात.

अमृता सुभाष म्हटलं की आपल्या समोर तिचं एकच असं ठराविक काम येत नाही कारण तिने केलेल्या प्रत्येक कामामध्ये ती उत्कृष्टच राहिली आहे. तिची प्रत्येक भूमिका हे वेगळी असते. अशी ही अमृता सध्या आपल्याला हिंदी आणि मराठी अशा दोन्ही चित्रपटसृष्टीत काम करताना दिसते. हीच अमृता सुभाष वयाच्या १७ व्या वर्षी संदेश कुलकर्णीच्या प्रेमात पडली होती.

संदेश कुलकर्णी म्हणजे सुप्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांचा भाऊ! ज्याची एक लेखक, दिग्दर्शक, अभिनेता म्हणून स्वतःची अशी ओळख आहे. पण लगेच लक्षात यावं यासाठी सोनाली कुलकर्णी यांच्या संदर्भ दिला. असो तर झालं असं की १७ वर्षांची अमृता ही सोनालीच्या वाढदिवसाला तिच्या घरी गेली होती. परंतु सोनाली अगोदर अमृताच्या समोर सदरा घातलेला, हाताच्या बाह्या दुमडलेल्या अवस्थेत जो तरुण आला तो होता संदेश कुलकर्णी.

Amruta Subhash
Amruta Subhash

बस्स त्याच क्षणी अमृताला मनापासून वाटलं की हाच आपला आयुष्यभराचा साथीदार! पुढे दोघांमध्ये मैत्री झाली. अमृताने पुढाकार घेऊन संदेशला प्रपोज केलं आणि २६ वर्षांपूर्वी ३जानेवारी रोजी संदेशने तिला होकारदेखील दिला. अशी सुरू झाली या दोघांची प्रेमकहाणी! २६ जून २००३ मध्ये या दोघांनीही विवाह केला.

अमृता ही सुप्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती सुभाष यांची कन्या आहे. पुण्याच्या एस.पी. कॉलेजमधून तिने तिचं महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केलं. तसंच अभिनय प्रशिक्षणासाठी तिला घरातून नॅशनल स्कुल ऑफ ड्रामा येथे पाठवण्यात आलं. तिथे तिने थोर नाटककार सत्यदेव दुबे यांच्या अंतर्गत अभिनयाचं योग्य प्रशिक्षण घेतलं.

तिथे तिने अनेक हिंदी नाटकांमधून आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला. यानंतर महाराष्ट्रात परत आल्यावर तिने सुप्रसिद्ध मराठी नाटक ती फुलराणी मध्ये काम केलं. २००४ मध्ये तिने राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या श्वास चित्रपटामधून सिनेसृष्टीत पदार्पण केलं.

गल्ली बॉय, किल्ला, अस्तु, अवघाची हा संसार, सेक्रेड गेम्स, सिलेक्शन डे, चोक, वळू ही काही अमृताने मुख्य भूमिका साकारलेल्या प्रसिद्ध कलाकृतींची नावं आहेत. अमृता ही प्रशिक्षित शास्त्रीय गायिका असून तीने भरतनाट्यम या नृत्य प्रकाराचं देखील प्रशिक्षण घेतलेलं आहे.

आजमितीला अमृता आणि संदेश यांच्या लग्नाला १७ वर्षे झाली आहेत. या सतरा वर्षांच्या प्रदीर्घ काळात अमृताच्या यशामागे कुठे ना कुठे संदेशचा आणि संदेशच्या यशामागे अमृताचा हात नक्कीच आहे. त्याशिवाय इंडस्ट्रीमध्ये काम करताना या दोघांनाही संसाराचा हा रहाटगाडा खेचणं अगदी कठीण होऊन बसलं असतं.

हे देखील वाचा