Wednesday, July 3, 2024

‘पवित्र रिश्ता’ मालिकेला १२ वर्षे पूर्ण, अंकिता लोखंडेने व्हिडिओ शेअर करत सुशांत आणि मालिकेच्या आठवणींना दिला उजाळा

टेलिव्हिजन इंडस्ट्रीमधील सुवर्णपान म्हणून ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेचे नाव घेता येईल. या मालिकेने लोकप्रियतेचे शिखर गाठले होते. आजही मालिका संपल्याच्या इतक्या वर्षांनंतरही प्रेक्षकांच्या मनात ही मालिका घर करून आहे. ही मालिका प्रसारित होऊन आता १२ वर्ष पूर्ण झाले. १ जून, २००९ रोजी या मालिकेचा पहिला भाग प्रसारित झाला होता. याच निमित्ताने या मालिकेची मुख्य अभिनेत्री असलेल्या अंकिता लोखंडेने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर करत मालिकेच्या आणि सुशांत सिंग राजपूतच्या आठवणींना उजाळा दिला आहे.

या मालिकेने अंकिता आणि सुशांत यांना तुफान लोकप्रियता मिळवून दिली. या दोघांमध्ये असलेली केमिस्ट्री प्रेक्षकांना खूप भावली. ऑनस्क्रीन असणारे हे कपल ऑफस्क्रीनमध्ये देखील रिलेशनशिपमध्ये आले. अनेक वर्ष त्यांनी एकमेकांना डेट केले. मात्र, दुर्दैवाने त्यांचे नाते लग्नाच्या बंधनापर्यंत पोहोचू शकले नाही. काही वर्षांनी हे लोकप्रिय आणि क्यूट कपल वेगळे झाले. आज सुशांत आपल्यासोबत नाही. मात्र, अंकिताने तिच्या पोस्टमधून सुशांतच्या आणि तिच्या मालिकेच्या संपूर्ण टीमच्या आठवणींना उजाळा दिला आहे.

अंकिताने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये मालिकेच्या टायटल ट्रॅक सोबत या मालिकेच्या संपूर्ण टीमचे फोटो आहे. शूटिंग दरम्यान कॅमेरामध्ये कैद केलेले अनेक अमूल्य क्षण, मालिकेच्या प्रत्येक कलाकारांचे फोटो अंकिताने या टायटल ट्रॅकसोबत जोडले आणि तीन मिनिटांचा एक सुंदर व्हिडिओ तयार केला आहे. शिवाय टायटल ट्रॅक संपल्यानंतर सुशांत आणि अंकिताचा एक सीन देखील यात दिसतो. ज्यात ढगांमध्ये हे दोघे उभे असतात आणि सुशांत म्हणतो, “जो रिश्ते दिल से जुड़े होते हैं, वे जिंदगी भर तो साथ रहते हैं, जिंदगी के बाद भी साथ देते हैं.”

हा व्हिडिओ शेअर करताना अंकिताने लिहिले, “हो, आज पवित्र रिश्ता सुरू होऊन १२ वर्षे पूर्ण झाली. वेळ कसा वाऱ्यासारखा उडून गेला समजलेच नाही. ६६ पुरस्कार जिंकलेला हा शो भारतीय टेलिव्हिजन इंडस्ट्रीमधला सर्वात लोकप्रिय आणि प्रसिद्ध हो म्हणून नावारूपाला आला जो आजही आहे. या मालिकेने मला फक्त अर्चना म्हणून एक नवीन ओळखच मिळवून नाही दिली, तर संपूर्ण जगभरातील लोकांचे प्रचंड प्रेमही दिले आणि मी आज जे आहे ते मला बनवले. ही ती कथा आहे जी जीवन, प्रेम, कुटुंब, मैत्री साजरी करते. मला अर्चना बनवण्यासाठी बालाजी टेलिफिल्म्स एकता कपूर यांचे खूप आभार. सोबतच संपूर्ण कास्ट, क्रू मेंबर आणि मला पाठिंबा देण्यासाठी आई, बाबा तुमचे आभार.”

हा व्हिडिओ अतिशय वेगाने व्हायरल होत असून, फॅन्सने यावर अतिशय भावनिक कमेंट्स देखील केल्या आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हे देखील वाचा