प्रसिद्ध गायक अरिजीत सिंहने प्लेबॅक सिंगिंगमधून निवृत्ती घेण्याची घोषणा केली असून ही माहिती त्याने इन्स्टाग्रामवरील पोस्टद्वारे चाहत्यांसोबत शेअर केली आहे. भारतीय चित्रपटसंगीतातील सर्वात ओळखली जाणारी आणि लोकप्रिय आवाजांपैकी एक असलेल्या अरिजीतने, आतापर्यंत मिळालेल्या प्रेम आणि पाठिंब्यासाठी चाहत्यांचे आभार मानले आहेत. यापुढे तो प्लेबॅक सिंगर म्हणून कोणताही नवीन प्रोजेक्ट स्वीकारणार नसल्याचे त्याने स्पष्ट केले असून, हा त्याच्या करिअरमधील मोठा बदल मानला जात आहे.
आजच्या घडीला अरिजीत सिंह (Arijit Singh)हा सर्वाधिक आवडता गायक असला, तरी केवळ गाण्यांमुळेच नव्हे तर त्याच्या काही सामाजिक उपक्रमांमुळेही त्याने चाहत्यांची मने जिंकली आहेत. त्यापैकी एक म्हणजे त्याने सुरू केलेले बजेट-फ्रेंडली रेस्टॉरंट, जिथे केवळ 40 रुपयांत पोटभर जेवण मिळते.
बॉलिवूडमधील अनेक कलाकारांची महागडी आणि एलिट वर्गाला लक्षात घेऊन सुरू केलेली रेस्टॉरंट्स आधीच चर्चेत आहेत. शिल्पा शेट्टी, अनुष्का शर्मा, सुनील शेट्टी, मलायका अरोरा यांसारख्या कलाकारांची रेस्टॉरंट्स प्रसिद्ध आहेत. मात्र अरिजीत सिंहने सामान्य आणि गरजू लोकांसाठी परवडणारे रेस्टॉरंट सुरू करून वेगळी वाट निवडली.
अरिजीत सिंहच्या रेस्टॉरंटचे नाव ‘हेशेल’ (Heshel) असून ते मुंबईपासून दूर, त्याच्या मूळ गावी पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद येथे आहे. हा उपक्रम समाजसेवेच्या उद्देशाने सुरू करण्यात आला असून, याबद्दल अनेकांनी अरिजीतचे कौतुकही केले आहे. या रेस्टॉरंटचे व्यवस्थापन प्रामुख्याने अरिजीतचे वडील गुरदयाल सिंह पाहतात, मात्र स्वतः अरिजीतही वेळोवेळी व्यवस्थापनावर लक्ष ठेवतो. येथे शाकाहारी आणि मांसाहारी दोन्ही प्रकारचे जेवण उपलब्ध आहे. कमी किमतीत, सन्मानाने जेवण मिळावे, हाच या रेस्टॉरंटचा मुख्य उद्देश आहे.
सध्या अरिजीत सिंह आपल्या रिटायरमेंटच्या घोषणेमुळे चर्चेत आहे. त्याने स्पष्ट केले आहे की तो फक्त प्लेबॅक सिंगिंगपासून दूर जात आहे, म्हणजेच आता तो चित्रपटांसाठी गाणी गाणार नाही. या निर्णयामुळे त्याचे चाहते भावनिक झाले असून सोशल मीडियावर अनेकजण त्याच्या पोस्टवर कमेंट करत या निर्णयामागील कारण विचारत आहेत.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा










