अर्जुन बिजलानी यांचे सासरे राकेश चंद्र स्वामी यांचे वयाच्या ७३व्या वर्षी स्ट्रोकमुळे निधन झाले आहे. सोमवार, २९ डिसेंबर २०२५ रोजी त्यांना प्रकृती बिघडल्याने ICU मध्ये दाखल करण्यात आले होते. ही बातमी कळताच अर्जुन बिजलानी दुबईतील आपल्या नववर्षाच्या सुट्ट्या अर्धवट सोडून तात्काळ भारतात परतले होते.
गुरुवारी झालेल्या अंत्यसंस्कारावेळी अर्जुन प्रचंड भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. कुटुंबीयांच्या उपस्थितीत त्यांनी सासऱ्यांना अखेरचा निरोप दिला. यावेळी अर्जुनने राकेश चंद्र स्वामी यांच्या पार्थिवाला खांदा देखील दिला.
सोशल मीडियावर समोर आलेल्या एका भावनिक व्हिडीओमध्ये अर्जुन बिजलानी (Arjun Bijlani) आपल्या मुलगा अयानला घट्ट मिठी मारून सांभाळताना दिसत आहेत. डोळ्यांत अश्रू असूनही ते मुलाला धीर देताना दिसतात. या व्हिडीओने अनेक चाहत्यांचे मन हेलावून टाकले आहे. राकेश चंद्र स्वामी यांच्या अंतिम दर्शनाचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
कुटुंबातील एका सदस्याने मिडियाला दिलेल्या माहितीनुसार, “ते पूर्णपणे ठणठणीत होते. जेवणासाठी बसणार इतक्यात अचानक त्यांना स्ट्रोक आला. तात्काळ त्यांना बेलेव्ह्यू हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले, जिथे त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. नेहा आणि अर्जुन बाहेर जाण्याआधी कुटुंबाला भेटून गेले होते, त्यामुळे हा धक्का सगळ्यांसाठीच अनपेक्षित होता. आम्ही अजूनही या दुःखातून सावरत आहोत.”
राकेश चंद्र स्वामी यांच्यावर गुरुवार, १ जानेवारी २०२५ रोजी दुपारी ओशिवारा स्मशानभूमीत कुटुंबीयांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात मुलगी नेहा स्वामी आणि मुलगा निशांक स्वामी असा परिवार आहे. विशेष म्हणजे अर्जुन बिजलानी आपल्या सासऱ्यांच्या खूप जवळ होते, कारण त्यांच्या स्वतःच्या वडिलांचे निधन बऱ्याच वर्षांपूर्वी झाले होते. त्यामुळे हा धक्का त्यांच्यासाठी अधिक वेदनादायक ठरला आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा
‘शाहरुख खानच्या चित्रपटांवर बहिष्कार टाकला पाहिजे…’ आयपीएल टीममुळे शाहरुख खान वादाच्या भोवऱ्यात










