रामानंद सागर यांच्या सुपरहिट टीव्ही मालिका ‘रामायण’मध्ये प्रभू श्रीरामांची भूमिका साकारणारे ज्येष्ठ अभिनेते अरुण गोविल आज आपला वाढदिवस साजरा करत आहेत. अभिनय कारकिर्दीत त्यांनी अनेक चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केले असले, तरी ‘रामायण’मधील श्रीरामांच्या भूमिकेमुळेच त्यांना घराघरात ओळख मिळाली. वाढदिवसाच्या निमित्ताने जाणून घेऊया त्यांच्या आयुष्यातील तो किस्सा, ज्यामुळे त्यांनी कायमस्वरूपी सिगारेटला रामराम ठोकला.
दूरदर्शनवरील ‘रामायण’मध्ये (Ramayan)श्रीरामांची भूमिका साकारल्यानंतर अरुण गोविल अक्षरशः देवासारखे पूजले जाऊ लागले. 1980 च्या दशकात अनेक लोक त्यांना प्रत्यक्ष भेटल्यावर पायाला हात लावायचे. 2020 मध्ये लॉकडाऊनदरम्यान ‘रामायण’चे पुन्हा प्रसारण झाल्यानंतर ही मालिका नव्या पिढीतही प्रचंड लोकप्रिय ठरली.
कपिल शर्मा शोमध्ये दिलेल्या मुलाखतीत अरुण गोविल यांनी एक किस्सा शेअर केला होता. एका तमिळ पौराणिक चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान, ज्यात ते बालाजी तिरुपतीची भूमिका साकारत होते, त्यांना सिगारेट ओढण्याची सवय होती. एका दिवशी दुपारच्या जेवणानंतर ते सेटवरील एका कोपऱ्यात सिगारेट ओढत असताना एका चाहत्याने त्यांना पाहिले.
त्या व्यक्तीला भाषा समजत नसली तरी त्याच्या हावभावातून राग स्पष्ट दिसत होता. नंतर भाषांतर करून कळले की तो चाहता म्हणत होता, “आम्ही तुम्हाला देव मानतो आणि तुम्ही सिगारेट ओढताय?”
हा प्रसंग अरुण गोविल यांच्या मनाला इतका लागला की त्यानंतर त्यांनी कधीही सिगारेट ओढली नाही.
अरुण गोविल यांनी आजवर 138 पेक्षा जास्त चित्रपट आणि टीव्ही मालिकांमध्ये काम केले आहे. हिंदीसह दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतही त्यांनी आपली छाप उमटवली. 2024 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘आर्टिकल 370’ या चित्रपटात त्यांनी साकारलेल्या पंतप्रधानांच्या भूमिकेचे विशेष कौतुक झाले. तरीही, त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीवर ‘रामायण’मधील प्रभू रामांची भूमिका आजही भारी पडताना दिसते. वाढदिवसानिमित्त चाहते आणि अनेक सेलिब्रिटी सोशल मीडियावरून अरुण गोविल यांना शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा
घटस्फोटानंतर मित्रासोबत नाव जोडल्यावर माही विजने तोडली मौन, जय भानुशालीने दिला पाठिंबा










