मराठीत सिनेसृष्टीतील सर्वात अजरामर चित्रपटांची यादी काढली तर त्यातील टॉप ५ मध्ये एका चित्रपटाचं नाव नक्की असेल तो म्हणजे अशी ही बनवा बनवी! या चित्रपटानं तर कमाईचे रेकॉर्डच ब्रेक केले होते. १९८८ साली आलेल्या या सिनेमाने तब्बल ३ कोटींची कमाई केली होती. १९६६साली आलेल्या हृषीकेश मुखर्जी यांच्या बिवी और मकान या सिनेमाचा रिमेक असलेल्या या सिनेमात अशोक सराफ, सचिन पिळगावकर, लक्ष्मीकांत बेर्डे आणि सिद्धार्थ रे या चौघांनी अक्षरशः धुमाकूळ घातला होता. आज या चौघांपैकी फक्त दोघेच कलाकार हयात आहेत.
लक्ष्या डिसेंबर २००४ मध्ये आपल्या सर्वांना सोडून गेला ते सर्वांच्याच लक्षात आहे परंतु चौथा कलाकार सिद्धार्थ रेदेखील त्याच वर्षी मार्च मध्ये निवर्तले हे फारसं कुणाला काही ठाऊक नाही. आज सिद्धार्थ रे यांच्याच बद्दल आपण जाणून घेणार आहोत.
सिद्धार्थ रे यांचा जन्म १९ जुलै १९६३ मध्ये झाला होता. सिद्धार्थ यांना घरातूनच अभिनय कलेचा वारसा मिळाला होता. आपल्याला ठाऊक आहे का की सिद्धार्थ हे चित्रपती व्ही. शांताराम यांचे नातू होते. यावरून आपल्याला लक्षात आलंच असेल की सिद्धार्थ यांना घरातूनच अभिनयाचं बाळकडू कसं मिळालं ते! १९७७ साली आलेल्या चानी सिनेमामध्ये बालकलाकाराची भूमिका त्यांनी साकारली. या चित्रपटाचं दिग्दर्शन त्यांचे आजोबा अर्थात व्ही शांताराम यांनी केलं होतं. यानंतर सिद्धार्थ रे १९८० मध्ये आलेल्या थोडीसी बेवफाई या चित्रपटातून मुख्य भूमिकेत झळकले. परंतु त्यांना हिंदीत खरी ओळख मिळाली ती १९९२ साली आलेल्या वंश या चित्रपटामुळे!
यानंतर त्यांनी परवाने, बाझीगर, पहचान, मिलिटरी राज, जानी दुष्मन: एक अनोखी प्रेम कहानी, पिता, बिच्छू, या आणि अशा बऱ्याच हिंदी चित्रपटांमध्ये काम केलं. २००४ मध्ये आलेला चरस: अ जॉईंट ऑपरेशन हा त्यांचा अखेरचा चित्रपट ठरला. त्यांनी अशी ही बनवा बनवी आणि बाळाचे बाप ब्रम्हचारी या प्रसिद्ध मराठी चित्रपटांमध्ये काम केलं.
सिद्धार्थ रे यांनी १९९९ मध्ये सुप्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्री भानुप्रिया यांची लहान बहीण शांतीप्रिया यांच्याशी विवाह केला. शांतीप्रिया यांनी दाक्षिणात्य सिनेमाबरोबरच हिंदी सिनेमांमध्ये देखील काम केलं. तसेच गेल्या काही काळापासून त्या हिंदी मालिका क्षेत्रातही काम करत आहेत.
शांतीप्रिया यांनी अक्षय कुमार सोबत सौगंध चित्रपटात तर मिथुन चक्रवर्ती यांच्यासोबत फुल और अंगार या चित्रपटात मुख्य भूमिका साकारली. या दोघांनीही लग्न केल्यावर त्यांना शुभम आणि शिष्य ही दोन मुलं झाली. यानंतर सगळं काही व्यवस्थित सुरू असताना अचानक २००४ साली सिद्धार्थ यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यांचं वयाच्या अवघ्या ४१ व्या वर्षी अकाली निधन झालं.
यानंतर मोठ्या हिंमतीने अभिनेत्री शांतीप्रिया यांनी त्यांची मुलं शुभम आणि शिष्य यांचं पालन पोषण केलं. त्यांना शिक्षण दिलं. यासोबतच आर्थिक बाजू सांभाळण्यासाठी त्या हिंदी मालिकांमध्ये कामं केली. त्यांनी विश्वामित्र, आर्यमान, माता की चौकी, द्वारकाधीश या मालिकांमध्ये प्रमुख भूमिका साकारल्या होत्या.