हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वोत्कृष्ट अभिनेत्यांमध्ये मोस्ट आयकॉनिक नाव म्हणजे अशोक कुमार. (Ashok Kumar)‘दादामुनी’ म्हणून लोकप्रिय असलेल्या या दिग्गज अभिनेत्याची आज पुण्यतिथी (10 डिसेंबर 2001). या निमित्ताने त्यांच्या संघर्षमय प्रवासाची, स्टारडमची आणि वैयक्तिक आयुष्यातील काही अनोळखी कथांची उजळणी करूयात.
अशोक कुमार यांचा जन्म १३ ऑक्टोबर १९११ रोजी भागलपूर येथे कुमुदलाल गांगुली म्हणून झाला. वकिलांच्या कुटुंबात जन्मलेले अशोक कुमार यांचे वडील त्यांनाही वकील बनवू इच्छित होते. त्यांनीही वडिलांच्या इच्छेप्रमाणे लॉ स्कूलमध्ये प्रवेश घेतला, परंतु पहिल्याच वर्षी ते नापास झाले. वडिलांची प्रतिक्रिया काय असेल या भीतीने ते मुंबईतील मोठ्या बहिणी सती देवी यांच्या घरी आले. त्यांचे मेहुणे बॉम्बे टॉकीजमध्ये काम करत असल्याने त्यांनी अशोक कुमार यांना प्रयोगशाळा सहाय्यक म्हणून नोकरी मिळवून दिली. महिन्याला ७५ रुपयांचा पगार मिळत असल्याने अशोक कुमार खूप आनंदी होते.
नियतीने येथेच वळण घेतले. बॉम्बे टॉकीजचे मालक हिमांशू राय यांनी जीवन नैया या चित्रपटातून नजम-उल-हसनला काढून टाकले आणि अचानक अशोक कुमार यांना नायक म्हणून घेण्याचा निर्णय केला. दिग्दर्शकांना ते ‘नायकासारखे’ वाटत नसले तरी हिमांशू राय यांच्या निर्णयामुळे अशोक कुमारचे अभिनेता म्हणून नवे जीवन सुरू झाले. मात्र या निर्णयाला त्यांच्या कुटुंबाचा विरोध होता. इतकेच नाही तर त्यांचे अरेंज्ड मॅरेजही मोडले. तरीही हिमांशू राय यांच्या प्रोत्साहनामुळे त्यांनी अभिनय सोडला नाही.
1943 मधील ‘किस्मत’ चित्रपटात त्यांनी अँटी-हिरोची भूमिका साकारली. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर अभूतपूर्व यशस्वी ठरला आणि 1 कोटींपेक्षा जास्त कमाई करणारा पहिला हिंदी चित्रपट बनला. त्यानंतर अशोक कुमारचे स्टारडम आकाशाला भिडले. ते जेथे जात तेथे हजारोंचा जमाव जमा व्हायचा, पोलिसांना गर्दी नियंत्रणात ठेवावी लागायची – आजच्या काळात दुर्मीळ असलेला असा प्रचंड स्टारडम त्यांनी अनुभवला. अशोक कुमार यांनी हिंदी सिनेमाला केवळ अभिनय नव्हे, तर उत्कृष्ट व्यक्तिमत्वाची प्रतिष्ठा दिली. आज त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा
गुगल ट्रेंड्स 2025; ‘वॉर 2’ आणि ‘कांतारा’ला मागे टाकत या सुपरहिट चित्रपटाने मारली बाजी










