छोट्या पडद्यावर स्वतःच्या अभिनयाची वेगळी छाप उमटवणारा अभिनेता आस्ताद काळे लवकरच स्वप्नाली पाटीलसोबत विवाहबद्ध होणार आहे. नुकतेच या दोघांच्या केळवणाचे फोटो सोशल मीडियावर वायरल झाले आहेत. आस्तादने त्याच्या आणि स्वप्नालीच्या नात्याची कबुली बिग बॉसच्या घरात दिली होती. पण तुम्हाला माहित आहे आस्ताद स्वप्नालीआधी एका मुलीवर जीवापाड प्रेम करायचा. मात्र त्या मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला. आज आम्ही तुम्हाला या लेखातून आस्तादच्या पहिल्या प्रेमाबद्दल सांगणार आहोत.
आस्ताद हा स्वप्नाली आधी प्राची मते या अभिनेत्रींच्या प्रेमात होता. प्राचीने अग्निहोत्र, चार दिवस सासूचे या मालिकांमध्ये काम केले होते. चार दिवस सासूचे या मालिकेत काम करताना आस्ताद आणि प्राची यांची मने जुळली, आणि ते एकमेकांच्या प्रेमात पडले.
मात्र नियतीला काहीतरी वेगळेच पाहिजे होते. कारण प्राचीला वयाच्या २३ व्या वर्षी अगदी दुर्लभ अशा बोनमॅरो कॅन्सरचे निदान झाले. दुर्दैवाने हा आजार अंतिम टप्प्यात असताना त्याचे निदान झाले. कॅन्सरमुळे प्राचीची तब्येत दिवसेंदिवस ढासाळायला लागली होती. त्यामुळे तिला मालिकांमध्ये देखील शक्य होत नसल्याने काम करणे बंद केले. तिच्या शेवटच्या दिवसांत आस्ताद सतत तिच्यासोबत होता. अखेर २०१३ ला प्राचीने अखेरचा श्वास घेत जगाचा निरोप घेतला. पुण्याची असणारी प्राची मराठी सिनेसृष्टीत नुकतीच स्थिरावत होती.
एवढे वर्ष सिंगल असणारा आस्ताद आता लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. स्वप्नाली पाटील हे त्याच्या होणाऱ्या पत्नीचे नाव असून ती देखील एक अभिनेत्री आहे. आस्ताद आणि स्वप्नाली यांची पहिली भेट एका मालिकेच्या पायलट भागाच्या शूटिंग वेळी झाली. यात हे दोघे बहीण भाऊ होते. त्यानंतर ३/४ वर्षांनी स्वप्नालीची आस्ताद काम करत असणाऱ्या पुढचं पाऊल मालिकेत एन्ट्री झाली. त्यानंतर यांच्यात मैत्री झाली आणि मग ते प्रेमात पडले. अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर पुढच्या महिन्यात हे लगीनगाठ बांधत आहे.