भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांच्या जन्मशताब्दी वर्षाला सुरुवात झाली आहे. राज्य शासनाच्या सांस्कृतिक विभागाकडून भारतरत्न पंडित भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत जीवनगौरव पुरस्कार देशातील अतिशय ख्यातनाम शास्त्रीय गायक, वादक कलाकारांना देण्यात येतो.
सन २०१२ सालापासून हा पुरस्कार सुरु झाला. संगीत क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तीला या पुरस्काराने सन्मानित केले जाते. ५ लाख रुपये, मानचिन्ह, स्मृतीचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप असते. संगीत क्षेत्रात अत्यंत मनाच्या समजल्या जाणाऱ्या या पुरस्काराने सन्मानित होणे प्रत्येक कलाकारासाठी अभिमानस्पद असते. यावर्षीचा भारतरत्न पंडित भीमसेन जोशी जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ व्हायोलिन वादक, गुरू विदुषी डॉ. एन. राजम यांना जाहीर करण्यात आला आहे.
सांस्कृतिक मंत्री अमित देशमुख यांच्या अध्यक्षतेखालील समितीने ही निवड केली. ह्या समितीमध्ये राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर, डॉ. अश्विनी भिडे-देशपांडे, उस्ताद फय्याज हुसेन खाँ, पं. उद्धव आपेगावकर, डॉ. राम देशपांडे, श्री श्रीनिवास जोशी यांचा पुरस्कार निवड समितीत समावेश होता. या समितीने २०२० च्या या पुरस्कारासाठी एन. राजम यांची निवड केली आहे.
एन. राजम यांनी वयाच्या तिसऱ्या वर्षापासून त्यांच्या वडिलांकडे कर्नाटकी पद्धतीने व्हायोलिनचे शिक्षण सुरू केले. त्यांच्या घरी सात पिढ्या कर्नाटकी संगीत होते. त्यांचे आजोबा आणि पणजोबा राजदरबारात वादक होते तर गायक आणि वीणावादक असलेले त्यांचे वडील विद्वान ए.नारायण अय्यर हे कर्नाटकी संगीतातले मोठे नाव. त्यांची तयारी बघून वयाच्या तेराव्या वर्षापासून त्यांना अनेक मोठ्या कलाकारांसोबत साथ करण्यासाठी भारतभर दौरे करण्याची संधी मिळाली. पं. ओंकरनाथ ठाकूर यांच्या गायकीने प्रभावित झाल्यामुळे त्या हिंदुस्तानी संगीताकडे आकर्षित झाल्या.
पं. ओंकारनाथ ठाकूर यांच्याकडून शिक्षण घेण्याची त्यांची प्रबळ इच्छा होती. मात्र तेव्हा ते बनारस हिंदू विश्वविद्यालयात अध्यापन करीत होते. त्यांच्याकडे शिक्षण घेता यावे म्हणून एन. राजम यांनी हिंदू विश्वविद्यालयात प्रवेश घेतला. पंडित ठाकूर यांच्याकडे शिक्षण घेतल्यामुळे त्यांच्या वादनावर ग्वाल्हेर घराण्याचा प्रभाव पडला.
हिंदू विश्वविद्यालयातील शिक्षणानंतर त्यांनी तिथेच ‘फाईन आर्टस’ विभागात अध्यापनाला सुरुवात केली, नंतर त्याच विभागच्या त्या प्रमुख बनल्या. पुढे त्यांना विविध ठिकाणांवरून देश- विदेशातून त्यांची कला सादर करण्यासाठी त्यांना आमंत्रण येऊ लागली. हळू हळू त्यांची कीर्ती सर्वदूर पसरली.
वयाच्या ४० वर्ष त्यांनी बनारस विश्वविद्यालयात अध्यापनाचे काम केले. त्यानंतर त्या मागील २० हून अधिक मुंबईमध्ये वास्तव करीत आहेत. राजम यांनी अनेक उत्कृष्ट शिष्य घडवले त्यातच त्यांनी त्यांच्या कन्या संगीता शंकर आणि नाती नंदिनी व रागिणी शंकर यांना देखील व्हायोलिन वादनाचे शिक्षण दिले.
राजम यांना लहान मोठ्या अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. त्यांना त्यांच्या शास्त्रीय संगीत क्षेत्रातील योगदानाबद्दल संगीत नाटक अकादमी पुरस्कार तसेच भारत सरकारच्या सर्वोच्च अशा पद्मश्री आणि पद्मभूषण पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.
यापूर्वी हा पुरस्कार किशोरी आमोणकर, पं. जसराज, श्रीमती प्रभा अत्रे, पं. राम नारायण, परविन सुलताना, माणिक भिडे, पं केशव गिंडे, पं. अरविंद परिख यांसारख्या अनेक मान्यवरांना प्रदान करण्यात आला आहे.