Saturday, July 6, 2024

बिग बॉसच्या घरात होणार ड्रामा क्वीन ‘राखी सावंत’ची एन्ट्री? स्पर्धकांना आताच भरलीये धडकी

कलर्स टीव्ही वरील वादग्रस्त कार्यक्रम बिग बॉस चं १४ वं पर्व सध्या सुरू आहे. दिवसेंदिवस या कार्यक्रमाची लोकप्रियता कमी होत चालली आहे आणि त्यामुळेच या कार्यक्रमाचे निर्माते दर आठवड्याला काही ना काही नव्या संकल्पना कार्यक्रमात आणत असतात. या आठवड्यात आपल्याला बिग बॉस च्या घरात मागील काही पर्वातील स्पर्धक या पर्वात भाग घेताना दिसणार आहेत अशी चर्चा आहे. यात राखी सावंत, राहुल महाजन या दोन मराठमोळ्या चेहऱ्यांचा देखील समावेश असणार आहे.

बिग बॉस च्या घरात सतत काही ना काही वाद घडतच असतात आणि हाच या कार्यक्रमाचा पॅटर्न देखील आहे असं म्हटलं जातं. बिग बॉस चं हे पर्व आता अंतिम टप्प्यात आलं आहे. या टप्प्यात कार्यक्रम आणखी रंगतदार बनवण्यासाठी निर्माते बिग बॉस च्या मागील काही पर्वातील स्पर्धकांना या पर्वात आणत असल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत.

यात पहिल्या पर्वातील राखी सावंत, दुसऱ्या पर्वातील राहुल महाजन, दहाव्या पर्वातील मनू पंजाबी तसेच अकराव्या पर्वातील विकास गुप्ता आणि आर्शी खान यांचा समावेश असणार आहे. राखी सावंत हिला बॉलिवूडमध्ये ड्रामा क्वीन म्हणून देखील ओळखलं जातं. ती बिग बॉसच्या पहिल्या पर्वात स्पर्धक म्हणून सहभागी झाली होती याव्यतिरिक्त तिने अनेक हिंदी सिनेमांमध्ये अभिनेत्री, डान्सर म्हणून काम केलं आहे. याशिवाय तिने टेलिव्हिजन टॉक शो चं निवेदन देखील केलेलं आहे. २०१४ मध्ये राखीने लोकसभेची निवडणूकसुद्धा लढवली होती.

विकास गुप्ता हा मालिका विश्वात निर्माता म्हणून कार्यरत आहे. तर त्याच्या चाहत्या वर्गाकडून त्याला बिग बॉस च्या खेळातील मास्टर माईंड म्हणून देखील संबोधलं जातं. विकास गुप्ता हा बिग बॉस च्या अकराव्या पर्वाच्या अंतिम फेरीत पोहोचला होता तसेच तृतीय क्रमांक देखील पटकावला होता.

राहुल महाजन हे भाजपचे दिवंगत नेते प्रमोद महाजन यांचे पुत्र असून त्यांनी बिग बॉसच्या दुसऱ्या पर्वात आपला सहभाग नोंदवला होता. राहुल देखील अंतिम फेरीपर्यंत पोहोचले होते परंतु अंतिम फेरीच्या काही दिवस आधी बिग बॉसच्या घराची भिंत ओलांडून काही इतर स्पर्धकांसोबत पलायन केले होते.

याशिवाय घरात प्रसिद्ध विनोदी अभिनेता कृष्णा अभिषेक याची पत्नी कश्मिरा शाह, मनू पंजाबी व आर्शी खान हे देखील या पर्वात पुन्हा बिग बॉसच्या घरात दाखल होणार आहेत. या चर्चित नावांपैकी राखी सावंत आणि विकास गुप्ता या दोन व्यक्ती जर बिग बॉसच्या घरात आल्या तर घरात सध्या राहत असलेल्या स्पर्धकांना नाके नऊ आणल्याशिवाय राहणार नाहीत अशा चर्चा सध्या सर्वत्र रंगू लागल्या आहेत.

आता खरंच ही मंडळी पुन्हा एकदा बिग बॉसच्या घरात येणार का? आणि आलेच तर कोण कोण येणार हे देखील या आठवड्यात आपल्याला पाहायला मिळेल.

हे देखील वाचा