आपल्याकडे सिनेमाचं वेड हे मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतं. मग प्रेक्षकांना त्यांच्या आवडत्या नट- नट्यांच्या सिनेमातील प्रत्येक संवाद हा अगदी तोंडपाठ असतो. पण कधी कधी मात्र अचानक ऐनवेळी ते संवाद विसरायला देखील होत असतात. हा संवाद जर शोले सिनेमातला असेल आणि समोर प्रश्न विचारायला खुद्द अमिताभ बच्चन असतील तर…
सध्या ‘कौन बनेगा करोडपती’ या कार्यक्रमाचं बारावं पर्व सुरू आहे. परंपरेप्रमाणे याही पर्वाचं सूत्रसंचालन बिग बी अमिताभ बच्चन हेच करत आहेत. केबीसी च्या हॉट सीट वर एकदा तरी बसावं आणि पैसे जिंकावे अशी प्रत्येकाची इच्छा असते. हलदवानी च्या रुचिका त्रिपाठी यांना ३० नोव्हेंबरच्या भागात ही संधी मिळाली आणि त्यांनी १२ लाख ५० हजारांची मोठी रक्कम सुद्धा जिंकली. परंतु या त्यांच्या खेळात एक क्षण असा आला की खुद्द अमिताभ बच्चन हे चकित झाले.
रुचिका याना खेळात “शोले सिनेमात ‘हम अंग्रेजो के जमाने के जेलर है।’ हा संवाद कोणत्या अभिनेत्याने म्हटला आहे?” असा प्रश्न विचारण्यात आला. परंतु रुचिका या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी लाईफ लाईन वापरण्याचा निर्णय घेतला आणि अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या भुवया उंचावल्या. त्यांनी रुचिका याना आपण सिनेमे पाहत नाही का असा प्रश्न विचारला त्यावर त्या म्हणाल्या, ” मी सिनेमे पाहते आणि शोले हा सिनेमासुद्धा मी पाहिला आहे परंतु मला हा संवाद नेमका कुणी म्हटला होता हे आठवत नाही आहे.” अखेर रुचिका यांनी लाईफ लाईन वापरून “असरानी” हे योग्य उत्तर दिलं आणि खेळ पुढे सरकला.
अमिताभ आणि धर्मेंद्र या जोडगोळीच्या शोले सिनेमाने भारतीय सिनेसृष्टीत एक वेगळा इतिहास रचला होता. आजही प्रत्येकाच्या ओठी शोले सिनेमाचे संवाद सहज ऐकायला मिळतात. अशात जर रुचिका यांच्या सारखा प्रसंग घडला आणि अमिताभ चकित झाले नाही तरच नवल!