नवी दिल्ली । बॉलिवूड सुपरस्टार सलमान खानचा प्रसिद्ध रियॅलिटी शो बिग बॉसच्या १४ व्या सिझनला शनिवारी सुरुवात झाली आहे. आता बिग बॉसच्या घरात खळबळ उडणार आहे. कारण बिग बॉसच्या घरात ‘वाईल्ड कार्ड एन्ट्री’ होणार आहे. ही साधी सुधी एन्ट्री नसून ‘गुंडा’ चित्रपटातील मिथुन चक्रवर्तीच्या को स्टार सपना सप्पूची एन्ट्री होणार आहे.
बॉलिवूड लाईफ डॉट कॉमच्यानुसार बिग बॉस १४ व्या सिझनची सुरुवात करत शो मध्ये लवकरच वाईल्ड कार्ड एन्ट्री होणार आहे. तरीही याबाबत अधिकृत पुष्टी झालेली नाही. शोमधील वरिष्ठ स्पर्धक सिद्धार्थ शुक्ला, गौहर खान आणि हिना खान हे शोची मजा दुप्पट करत आहेतच. परंतु या बातमीने बिग बॉसच्या घरातील नियम बदलतील.
सपनाने हिंदी, भोजपूरी आणि गुजरातीसह २५० पेक्षा अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. ई टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत सपना म्हणाली की, “खूप मोठी अभिनेत्री बनू शकली नाही याचा मला खेद नाही. कारण नशीबात हेच लिहिले होते. मला कोणाचीही तक्रार नाही.” सपना पुढे बोलताना म्हणाली की, “मी मोठ्या चित्रपटांमध्ये अभिनेत्री बनण्यात अयशस्वी ठरले. पण मी छोट्या चित्रपटांची एक मोठी आणि यशस्वी अभिनेत्री आहे यात शंका नाही.”
२०१३ साली गुजरातच्या एका बिझनेसमनशी लग्न केल्यानंतर आता अभिनेत्री सपना त्याच्याशी घटस्फोट घेत आहे. याबाबतीत सपना म्हणते की, “आयुष्यात अनेक चढ-उतार येतात. अनेक समस्यांमध्ये मला माझा एकुलता एक मुलगा टायगर जो आता केवळ ५ वर्षांचा आहे, त्याला घेऊन मुंबईला यावे लागले. मी सध्या माझ्या घटस्फोटाचा खटला लढत आहे.”
सपना पुढे म्हणाली, “जेव्हा मी मुंबईला आले, तेव्हा माझ्याकडे काम नसल्यामुळे मला आर्थिक समस्यांचा सामना करावा लागला. अनेकवेळा आत्महत्या करण्याचा विचार आला. परंतु मुलाकडे पाहून मी माझा विचार बदलला. त्यानंतर मी निर्णय घेतला की, काहीही होवो मला याच्यासाठी आयुष्य जगायचंय.”
“आता मला काम मिळालं आहे त्यासाठी देवाला माझा धन्यवाद. गोष्टी बदलत आहेत,” असेही पुढे बोलताना सपना म्हणाली.