Monday, July 1, 2024

‘राज’ चित्रपटाला झाले २० वर्ष पूर्ण, बॉयफ्रेंडला भेटायला गेलेल्या बिपाशा बसूला असा मिळाला होता रोल

अभिनेत्री बिपाशा बसू सध्या सिनेसृष्टीत फारशी दिसत नसली तरी तिच्या लोकप्रिय चित्रपटांची आजही चर्चा होताना दिसते. आपल्या कसदार अभिनयाने आणि अदांनी तिने अनेक चित्रपट यशस्वी केले आहेत. मात्र तिने भूमिका साकारलेल्या ‘राज’ चित्रपटाने प्रेक्षकांना चांगलेच आकर्षित केले होते. तेव्हापासूनच तिच्या अभिनयाची सर्वत्र चर्चा पाहायला मिळाली मात्र या चित्रपटासाठी भूमिका मिळण्याची एक मजेशीर गोष्ट तिने सांगितली जी ऐकून तुम्हीही थक्क व्हाल. काय आहे ते सत्य चला जाणून घेऊ.

अभिनेत्री बिपाशा बसूच्या (Bipasha basu) गाजलेल्या भयपटांमध्ये सर्वात आधी नाव घेतले जाते ते म्हणजे ‘राज’ चित्रपटाचं. बिपाशा आणि डीनो मोरियोच्या दमदार अभिनयाने या चित्रपटाला जोरदार यश मिळवून दिले होते. बिपाशाचा बोल्डनेस आणि नदीम श्रवणच्या संगीताच्या जादूने या चित्रपटाची २० वर्षानंतरही चर्चा पाहायला मिळते. विक्रम भट्ट यांनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपट १ फेब्रुवारी २००२ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. चित्रपटात आशुतोष राणा,मालिनी शर्मा यांनीही प्रमुख भूमिका साकारल्या होत्या. या चित्रपटातील भूमिकेने बिपाशाला रातोरात स्टार केले. मात्र या चित्रपटाची ऑफर मिळण्याचीही एक रंजक कहाणी आहे.

बिपाशा बसूच्या करिअरसाठी मैलाचा दगड ठरलेल्या या चित्रपटासाठी ती पहिली पसंत अजिबात नव्हती. ही भूमिका सर्वप्रथम लिसा रे या अभिनेत्रीला देण्यात आली होती. याबद्ल बोलताना बिपाशाने सांगितले की, ”त्यावेळी मी आणि डिनो रिलेशनशीपमध्ये होतो. जेव्हा मी त्याला भेटायला चित्रपटाच्या सेटवर गेले तिथेच मला या चित्रपटासाठी ऑफर मिळाली”.

ज्यावेळी बिपाशा आपल्या बॉयफ्रेंडला भेटायला चित्रपटाच्या सेटवर गेली तेव्हा तिथे वेगळाच गोंधळ चालला होता.कारण चित्रपटाच्या नायिकेने ऐनवेळी काम करण्यास नकार दिला होता. त्यामुळे दिग्दर्शक महेश भट्ट यांनी बिपाशाला ही भूमिका करण्यासाठी आग्रह केला, अशाप्रकारे या भूमिकसाठी तिची निवड करण्यात आली.

या बद्दल बोलताना बिपाशा म्हणते की, ”आज दोन दशकानंतर हा चित्रपट पाहिल्यानंतर असे वाटते की ही भूमिका माझ्यासाठी नव्हतीच. माझी अभिनय क्षेत्रात काम करण्याची काही तयारी नव्हती. मात्र या चित्रपटाने मला खरी ओळख दिली”. या चित्रपटाने मला खूप काही शिकवल्याचही ती आवर्जुन सांगते.दरम्यान या चित्रपटानंतर बिपाशा बसूची अनेक भयपटांसाठी निवड करण्यात आली. ज्यामध्ये तीने आपल्या अभिनयाने सर्वांना मोहित केले होते.

हेही वाचा :

हे देखील वाचा