Saturday, July 6, 2024

अनुराग यांनी दिले अनेक सुपरहिट चित्रपट, मात्र अपयशी ठरले वैयक्तिक आयुष्य; वाचा त्यांच्याबद्दल कधीही न ऐकलेल्या गोष्टी

चित्रपट दिग्दर्शक, लेखक, हिंदी चित्रपट उद्योगाचे चित्रपट निर्माते अनुराग कश्यप यांचा जन्म १० सप्टेंबर १९७२ रोजी झाला. उत्तर प्रदेशातील गोरखपूर या प्रसिद्ध शहरात जन्मलेले अनुराग पठडीबाहेरील चित्रपट बनवण्यासाठी ओळखले जातात. सिनेमात दुर्मिळ प्रयोग करणाऱ्या अनुराग यांना अनेक चित्रपट पुरस्कार मिळाले आहेत. अनुराग हे असे चित्रपट निर्माते आहे जे मनोरंजक पद्धतीने प्रेक्षकांसमोर समाजाचे कटू सत्य मांडतात.

अनुराग यांचा सर्वात यशस्वी चित्रपट ‘गँग्स ऑफ वासेपूर’ला मानले जाते. असे म्हटले जाते की, चित्रपट बनवल्यानंतर वासेपूर इतके बदनाम आणि लोकप्रिय झाले की, तेथील लोकांना त्रास होऊ लागला. इथे घडणाऱ्या काही खऱ्या घटनांमध्ये इतका मसाला लावून समोर मांडले आहे की, वासेपूरचे हिंसक दृश्य प्रेक्षकांच्या मनातून बाहेर पडत नाही. त्यामुळे तेथील लोक खूप नाराज झाले आहेत. याबद्दल स्वतः अनुराग यांनी एकदा मीडियाशी बोलताना सांगितले की, “चित्रपट बनवताना ही गोष्ट आमच्या मनात आली नाही. आम्हाला फक्त एक चांगला चित्रपट बनवायचा होता. पण चित्रपट बनवल्यानंतर आम्हाला वाटले नव्हते की, ते आयुष्यापेक्षा मोठे असेल. हा चित्रपट लोकांच्या हृदयावर इतका प्रभाव टाकेल याची कल्पनाही केली नव्हती.” अनुराग पुढे म्हणाले होते की, “मी आता काय करू शकतो? पण यासाठी मी वासेपूरच्या लोकांची माफी मागतो.” ( birthday special anurag kashyap born in gorakhpur but wassepur people are annoyed to film director know reason)

अनुराग कश्यप यांचे वडील वीज खात्यात अभियंता होते. त्यामुळे त्यांची नेहमी बदली व्हायची. अनुराग यांनी आपले शालेय शिक्षण डेहराडून आणि ग्वाल्हेरमधून केले. त्यांनी दिल्ली विद्यापीठातील हंसराज महाविद्यालयातून पदवी प्राप्त केली. पदवी दरम्यानच, अनुराग यांना नाटक आणि रंगभूमीमध्ये रस वाटू लागला. ते पथनाट्य ग्रुप जन नाट्य मंचमध्ये सामील झाले. दिल्लीतील आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा अनुराग यांच्या जीवनावर इतका प्रभाव पडला की, त्याने चित्रपटांमध्येच आपले करिअर करण्याचा निर्णय घेतला.

अनुराग साल १९९३ मध्ये पहिल्यांदा मायानगरीत आले आणि स्वतःला संघर्षात झोकून दिले. असे म्हटले जाते की, जेव्हा अनुराग मुंबईला पोहोचले, तेव्हा त्यांच्याकडे फक्त ५ हजार रुपये होते. अनेक यशस्वी अभिनेते-लेखक आणि चित्रपट निर्मात्यांप्रमाणे त्यांनाही सुरुवातीला खूप अडचणींना सामोरे जावे लागले. एखाद्या मालिकेत कामही केले. मनोज बाजपेयींनी अनुराग आणि राम गोपाल वर्मा यांची भेट घडवून आणली. तेव्हा त्यांना ‘सत्या’ हा चित्रपट लिहिण्याची संधी मिळाली. त्यांनी सौरभ शुक्लासोबत ‘सत्या’ लिहिला. त्यानंतर चित्रपटाच्या यशाने अनुराग यांची कारकीर्दही पुढे नेली. त्यांनी ‘शूल’ आणि ‘कौन’ चित्रपटांसाठी डायलॉगही लिहिले.

त्यानंतर अनुराग यांनी एक चित्रपट निर्माता म्हणून ‘पांच’ हा चित्रपट बनवला, जो प्रदर्शितच झाला नाही. अनुराग कश्यप यांनी ‘ब्लॅक फ्रायडे’, ‘नो स्मोकिंग’, ‘देव डी’, ‘गँग्स ऑफ वासेपूर’ आणि ‘बॉम्बे वेलवेट’, ‘मनमर्जियां’ या चित्रपटांद्वारे आपली क्षमता सिद्ध केली आहे.

अनुराग त्यांच्या चित्रपटात जितके यशस्वी आहेत, तितकेच ते वैयक्तिक आयुष्यात अयशस्वी आहेत. त्यांचे पहिले लग्न १९९७ मध्ये चित्रपट संपादक आरती बजाज यांच्याशी झाले होते. जे फार काळ टिकू शकले नाही आणि २००९ मध्ये दोघांचा घटस्फोट झाला. यानंतर त्यांनी अभिनेत्री कल्की कोचलिनशी लग्न केले. ते देखील जास्त काळ चालले नाही. पाच वर्षे एकत्र राहिल्यानंतर २०१५ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. अनुराग यांना त्यांची पहिली पत्नी आरतीपासून एक मुलगी आलिया कश्यप आहे, जी तिच्या स्टाईलमुळे चर्चेत असते. अनुराग अनेकदा आपल्या मुलीसोबत सोशल मीडियावर फोटो पोस्ट करतात.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’च्या सेटवर एन्जॉय करताना दिसले ‘ही मॅन’; चहा पित म्हणाले, ‘चीयर्स!’

-‘मी विराट कोहलीच्या प्रेमात वेडी झाले होते’, म्हणत ऋतिक रोशनच्या ‘या’ अभिनेत्रीने केला खुलासा

-रवी तेजा ईडीच्या कार्यालयात हजर, मनी लॉन्ड्रिंगसह ‘या’ प्रकरणीही करण्यात आली चौकशी

हे देखील वाचा