Sunday, July 14, 2024

राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या राजकुमार रावला रंगावरून केले गेले रिजेक्ट, आज आहे सर्वांचा आवडता अभिनेता

बॉलिवूडमध्ये आज अनेक असे कलाकार आहेत, ज्यांनी त्यांच्या अभिनयनाच्या जोरावर स्वतःची वेगळी ओळख आणि वेगळे स्थान निर्माण केले. भलेही ते दिसायला इतर कलाकारांच्या तुलनेत थोड्या फरकाने कमी असले तरी अभिनयाच्या बाबतीत ते खूपच हुशार आणि मुरलेले आहेत. ज्यांनी केवळ त्यांच्या अभिनयाच्या जोरावर छोट्या बजेटच्या चित्रपटांना मोठे यश मिळवून दाखवले. अशा कलाकारांची यादी खूप मोठी आहे. यातलेच बहुतेक कलाकार हे या ग्लॅमर जगात येण्याआधी रियॅलिटी शोमध्ये रिजेक्ट झाले होते. यातलाच एक अभिनेता म्हणजे राजकुमार राव.  

राजकुमार राव हिंदी सिनेमासृष्टीतील सर्वात गुणी अभिनेता आहे. त्याने आपल्या अभिनयाच्या जोरावर सिनेमासृष्टीमध्ये स्वतःचे असे स्थान निर्माण केले आहे. राजकुमार राव हा आजच्या घडीला हिंदी सिनेसृष्टीतील मोठी मागणी असलेला अभिनेता आहे. राजकुमाराने त्याच्या दमदार आणि जिवंत अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात वेगळे स्थान निर्माण असून, तो टॉपच्या अभिनेत्यांमध्ये सामील आहे. आज (३१ ऑगस्ट) राजकुमार त्याचा ३७ वा वाढदिवस साजरा करत आहे. त्यानिमित्ताने प्रकाश टाकूया त्याच्या या चित्रपटांच्या प्रवासावर.

राजकुमारचा जन्म ३१ ऑगस्ट १९८४ साली हरियाणाच्या गुरुग्राममध्ये झाला. लहानपणापासूनच बॉलिवूड अभिनेत्यांची नक्कल करायला त्याला खूप आवडायची. चित्रपटांमध्ये येण्यापूर्वी वयाच्या १६ व्या वर्षी त्याने त्यावेळी डान्ससाठी सुपरहिट असणाऱ्या ‘बुगी वूगी’ या शोसाठी ऑडिशन दिले होते. मात्र त्याला रिजेक्ट केले गेले. पण त्याने हे रिजेक्शन सकारत्मक पद्धतीने घेतले आणि स्वतःवर काम करण्यास सुरुवात केली. पुढे त्याने ‘फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया’ (FTII) मधून पदवी संपादन केली आणि तो मुंबईला आला.

अभिनेता होण्याचं स्वप्न उराशी बाळगून मुंबईला आल्यानंतर सुरुवातीच्या काळात त्याला प्रचंड संघर्ष करावा लागला. अनेक ठिकाणी छोटे छोटे काम केल्यानंतर एक दिवस त्याला दिवाकर बॅनर्जी यांच्या एका जाहिरातीकडे गेली. यामध्ये त्यांच्या आगामी चित्रपटासाठी त्यांना एक नवा चेहरा हवा होता. ही जाहिरात राजकुमार ऑडिशनसाठी गेला आणि त्याची निवड झाली. त्यानंतर त्याने ‘लव्ह, सेक्स और धोका’ हा पहिला सिनेमा केला. या चित्रपटातील त्याचा अभिनय प्रेक्षकांना आणि समीक्षकांना खूप आवडला.

पुढे तो ‘रागिनी एमएमएस 2′,’ गँग्स ऑफ वासेपुर पार्ट २’ सिनेमांमध्ये दिसला. मात्र त्याला खरी आणि अमाप लोकप्रियता मिळाली ती ‘काय पो चे’ चित्रपटातून. या सिनेमात सुशांत सिंह राजपूत देखील त्याच्यासोबत होता. या सिनेमानंतर त्याची अभिनयाची गाडी सुसाट धावायला लागली. त्यानंतर त्याने एकापेक्षा एक हिट सिनेमे दिले. कॉमेडीच्या टायमिंगसाठी देखील राजकुमार ओळखला जातो. त्याचे एक्सप्रेशनदेखील भन्नाट असतात.

एका मुलाखतीमध्ये त्याने सांगितले होते की, “मला अनेक रिजेक्शनचा सामना करावा लागला होता. मला एका दिग्दर्शकाने सांगितले होते की, मी गोरा नाही आणि माझे मसल्स नसल्याने त्यांनी मला रिजेक्ट केले होते. मला याच कारणावर भरपूर वेळा रिजेक्ट केले गेले.”

राज कुमार फक्त पठडीबाहेरील चित्रपटांसाठीच प्रसिद्ध आहे असे नाही. मात्र त्याने ‘न्यूटन’, ‘ओमेर्टा’ आदी चित्रपटातून त्याने त्याच्यातील सशक्त अभिनेत्याला सर्वांसमोर आणले. यासोबतच ‘स्त्री’, ‘शादी मैं जरूर आना’, ‘शिमला मिर्च’, ‘डॉली की डोली’ आदी अनेक कमर्शियल सिनेमे देखील केले.

राजकुमारने त्याच्या नावामध्ये बदल केला आहे. राजकुमार रावचे खरे आडनाव राव नाही तर यादव आहे. त्यामुळे राजकुमार राव याचे खरे नाव राजकुमार यादव असे असायला हवे. परंतु राजकुमारने राव आडनाव का वापरले या मागचे नेमके कारण सांगितले आहे. हे नाव बदलण्यामागचे कारण त्याने एका मुलाखतीमध्ये सांगितले होते. “हिंदी सिनेमासृष्टीमध्ये खूप राजकुमार आहेत. राजकुमार संतोषी, राजकुमार गुप्ता, राजकुमार हिरानी. मला अनेक फोन यायचे आणि ते मला सांगायचे त्यांना मला असिस्ट करायचे आहे. खूप विचार केल्यानंतर माझ्या लक्षात आले की, राजकुमार हे नाव माझ्यासह अजून तीन दिग्दर्शकांचे आहे. त्यामुळे लोकांचा गोंधळ होत आहे. मग मी राजकुमार राव हे नाव ठेवण्याचे ठरवले. कारण ‘राव’ ही हरियाणामध्ये यादवांमध्ये पदवी आहे. म्हणून मला राजकुमार राव नाव आवडले आणि मी ते आडनाव म्हणून घेतले.’

राजकुमारने त्याच्या लुक्सवर देखील स्क्रिप्टनुसार बदल केले. ‘हमारी अधुरी कहाणी’, ‘लुडो’, ‘बोस-डेड वर अलाइव्ह’, ‘बहन होगी ‘तेरी’ आणि राबता या प्रोजेक्टसमध्ये तो विविध रूपांमध्ये दिसला. राबता सिनेमात त्याने ४०० वर्ष जुन्या म्हताऱ्या व्यक्तीची भूमिका साकारली होती.

अभिनयासोबतच राजकुमार त्याच्या रिलेशनशिपमुळे देखील प्रकाशझोतात येतो. त्याच्या ‘सिटीलाईट्स’ चित्रपटातील राजकुमारची बायको असलेल्या पत्रलेखासोबत तो मागील काही वर्षांपासून नाटयत आहे. ‘एफटीआयआय’मध्येच दोघांची पहिल्यांदा भेट झालेली आणि एका शॉर्ट फिल्मच्या सेटवर दोघांच्या मैत्रीचं प्रेमात रुपांतर झाले.

राजकुमारला त्याच्या अप्रतिम अभिनयासाठी राष्ट्रीय पुरस्कारांनी देखील सन्मानित करण्यात आले आहे. आज राजकुमाराच्या नावावरूनच सिनेमात काहीतरी हटके आणि आकर्षक पाहायला मिळणार हे लोकांना माहीतच असते.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा- बॉलिवूड गाजवणारा अभिनेता ‘राजकुमार राव’ किंग खानमुळेच करू शकलाय पदार्पण; वाचा त्यांच्या प्रथम भेटीचा तो रंजक किस्सा
आज कोट्यवधींचा मालक असणाऱ्या राजकुमार रावने एकेकाळी काढलेत १८ रुपयात दिवस
आदित्य रॉय कपूरला डेट करतेय क्रिती सेनन? करण जोहरनेही सांगून टाकलं, ‘मी तुम्हाला कोपऱ्यात…’

 

 

हे देखील वाचा