‘चक दे इंडिया’ सिनेमा पाहिलाय का? असा प्रश्न विचारला, तर कदाचित सर्वांचे उत्तर हो असेच असेल. या सिनेमातील प्रीती सभरवाल या पात्राने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले होते. ही भूमिका साकारली होती, ती म्हणजे अभिनेत्री आणि मॉडेल सागरिका घाटगे हिने. शाहरुख खानच्या ‘चक दे इंडिया’ या चित्रपटातूनच तिने आपल्या चित्रपट कारकिर्दीला सुरुवात केली होती. या चित्रपटानंतर सागरिका अनेक चित्रपटांमध्ये दिसली. मात्र, २०१७ मध्ये तिने माजी भारतीय क्रिकेटपटू झहीर खानसोबत लग्न केले. त्यानंतर ती इंडस्ट्रीपासून दूर झाली होती. सागरिका शनिवारी (०८ जानेवारी) तिचा ३६ वा वाढदिवस साजरा करत आहे. चला तर मग तिच्या वाढदिवसानिमित्त तिच्या आयुष्याशी संबंधित काही खास गोष्टी जाणून घेऊया.
सागरिकाचा जन्म ८ जानेवारी, १९८६ रोजी कोल्हापूर येथे झाला आहे. कोल्हापूरच्या राजघराण्यात जन्मलेल्या सागरिकाची आजी सीताराजे (Sagarika Ghatge) या इंदूरचे महाराज तुकोजीराव होळकर यांच्या कन्या होत्या. सागरिकाचे वडील विजय घाटगे हे स्वतः चित्रपटसृष्टीशी संबंधित आहेत.
कॉलेजमधूनच चित्रपटाच्या सुरू झाल्या होत्या ऑफर्स
सागरिका घाटगे कॉलेजमध्ये शिकत असताना तिला जाहिरातींमध्ये काम करण्याच्या अनेक ऑफर्स मिळू लागल्या होत्या. मात्र, तिच्या अभ्यासामुळे वडिलांनी तिला काम करण्यास नकार दिला. सागरिकाने ग्रॅज्युएशन पूर्ण केल्यानंतर तिच्या कारकिर्दीला सुरुवात केली.
‘चक दे इंडिया’ पाहून लग्नाला होकार
सागरिका आणि माजी भारतीय क्रिकेटपटू झहीर खान यांच्या नात्याबद्दल बोलायचे झाले, तर त्यांचे नाते सर्वांसमोर तेव्हा आले, जेव्हा ते दोघेही युवराज सिंग आणि हेजल कीच यांच्या रिसेप्शनला एकत्र पोहोचले होते. एका कॉमन फ्रेंडच्या माध्यमातून दोघांची भेट झाली होती. पुढे त्यांनी २०१७ साली लग्नगाठ बांधली.
सागरिकाने माजी क्रिकेटपटू झहीर खानशी लग्न केले असले, तरीही एकदा तिने आपला पती म्हणून कोणत्या बॉलिवूड अभिनेत्याला पाहायला आवडेल याबद्दल तिने सांगितले होते. तिच्या या वक्तव्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला होता.
सागरिका एकदा माध्यमांशी बोलताना म्हणाली होती की, जर तिचा पती झहीर खानवर चित्रपट बनला, “तर मला रणबीर कपूरने झहीर खानची भूमिका साकारलेली आवडेल.”
झहीरने एका माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते की, जेव्हा त्याने सागरिकाशी लग्नाचा प्रस्ताव त्याच्या घरात ठेवला, तेव्हा कुटुंबातील सदस्यांनी आधी ‘चक दे इंडिया’ चित्रपट पाहिला होता, त्यानंतर लग्नाला होकार दिला होता.
हिंदीसोबतच मराठी आणि पंजाबी चित्रपटांमध्ये काम केलेली सागरिका ‘चक दे इंडिया’नंतर २००९ मध्ये ‘फॉक्स’ या चित्रपटात दिसली. त्याचवेळी २०१७ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘इरादा’ चित्रपटातील तिच्या कामाचे खूप कौतुक झाले होते. सागरिकाने २०१९ मध्ये ओटीटीवरही पदार्पण केले. तिची अल्ट बालाजीवर पहिली सीरिज ‘बॉस: फादर ऑफ स्पेशल सर्व्हिसेस’ २०१९ मध्ये प्रदर्शित झाली.
सागरिका ही राष्ट्रीय स्तरावरील आहे हॉकी खेळाडू
‘चक दे इंडिया’ या चित्रपटात सागरिकाने हॉकीपटूची भूमिका साकारली होती आणि तिची भूमिका दमदारपणे साकारली होती. पण तुम्हाला माहित आहे का? की, खऱ्या आयुष्यातही सागरिका राष्ट्रीय स्तरावरील हॉकी खेळाडू राहिली आहे.
हेही नक्की वाचा-
- Supriya@61: शाहिद कपूरची सावत्र आई असलेल्या सुप्रिया पाठक यांचा ‘हंसा पारेख’ होण्याचा थक्क करणारा प्रवास
- सर्वांच्या विरोधात जाऊन सुप्रियांनी ‘असा’ थाटला पंकज कपूरांशी संसार, शाहिदलाही देतात पोटच्या मुलाइतकं प्रेम
- बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री असलेल्या बिपाशाचा मार्ग नव्हता सोपा, पैशांची बचत म्हणून करायची १० रुपयांत जेवण
हेही पाहा-