‘तुम्ही चेहऱ्याची प्लॅस्टिक सर्जरी केलीय का?’ शेवटी अमृता फडणवीसांनी खुलासा केलाच

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadanvis) सोशल मीडियावर चांगल्याच सक्रिय असतात. आपल्या गाण्यांमुळे आणि त्यांच्या स्पष्टवक्तेपणासाठी त्या चांगल्याच प्रसिद्ध आहेत. विविध राजकीय विषयांवर त्या सोशल मीडियावरुन रोखठोक मांडताना दिसत असतात. त्यांच्या या वक्तव्यांमुळे अनेकदा त्यांच्यावर जोरदार टिकाही होताना दिसत असते. अलिकडेच त्यांनी मराठी टेलिव्हिजनवरील बस बाई बस या कार्यक्रमात हजेरी लावली होती. यावेळी त्यांना कार्यक्रमात अनेक मजेशीर प्रश्न उत्तरे विचारण्यात आली ज्यावर त्यांनीही दिलखुलासपणे आपले मत मांडले आहे. 

याबाबत संपूर्ण माहिती अशी की, झी मराठी वाहिनीवरील ‘बस बाई बस’ का कार्यक्रम नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. सुरुवातीपासूनच या कार्यक्रमाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. याचे कारण म्हणजे कार्यक्रमात अनेक दिग्गज सेलिब्रिटी हजेरी लावताना दिसत असतात. काही दिवसांपूर्वीच या कार्यक्रमात खासदार सुप्रिया सुळे यांनीही हजेरी लावली होती. त्यानंतर आता लवकरच कार्यक्रमात अमृता फडणवीस हजेरी लावणार आहेत ज्याचा प्रोमो सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

या कार्यक्रमात एका महिलेने अमृता फडणवीस यांना थेट “तुम्ही प्लॅस्टिक सर्जरी केली आहे का?” असा प्रश्न विचारला. हा प्रश्न ऐकून सर्वच जण जोरजोरात हसायला लागले. या मजेशीर प्रश्नाचे उत्तर देताना अमृता फडणवीस यांनी “बरे झाले तुम्ही मला हा प्रश्न विचारला. यावरुन मला अनेकदा सोशल मीडियावर ट्रोल केले जाते. प्लॅस्टिक सर्जरी ही खूप महागडी प्रक्रिया आहे. त्यामध्ये खूप धोकाही असतो तसेच काही बिघडल तर सगळा चेहराही खराब होऊ शकतो,” असा खुलासा केला.

त्याचबरोबर अमृता फडणवीस यांनी पुढे बोलताना मी लग्नाआधी एकदाही पार्लरला गेली नसल्याचेही सांगितले. लग्नात जेवढा मेकअप होता तेवढाच मेकअप मी केला होता असे म्हणत “देवेंद्रजींना माझा चेहरा नाही तर माझे मन आवडते,” असे त्या म्हणाल्या. त्यांच्या या वाक्यानंतर कार्यक्रमात चांगलाच हशा पिकलेला पाहायला मिळाला.

Latest Post