माणसाच्या आयुष्यात रोज काहीतरी नवीन घडताना दिसत असते, त्यातून काहीतरी शिकत तो पुढे जात असतो. आयुष्यात जसे चांगले दिवस असतात, त्याच चांगल्या दिवसांना अनुभवायला त्याला बऱ्याचदा अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. असेच काहीसे कलाकारांच्या बाबतीत पण होत असते.
अगदी महानायक अमिताभ बच्चन यांनादेखील हे चुकले नाही. सत्तरच्या दशकापासून लोकांचे मनोरंजन करणारे बच्चन हे बॉलीवूडमधील सर्वात महान कलाकार समजले जातात. असे असले तरीही एक काळ असा होता की, जेव्हा त्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागला होता. अमिताभ बच्चन यांनी जे यश मिळवले, ते अचानक त्याच्या हातातून निसटून जात होते. अगदी स्पष्ट भाषेत सांगायचं तर बच्चन पुर्णपणे अपयशी ठरले होते व कंगाल होण्याच्या मार्गावर होते.
अमिताभ बच्चन चित्रपटात हिट होत होते आणि याचदरम्यान ९०च्या दशकात त्यांनी एबीसीएल नावाची कंपनी सुरू केली होती. त्यांना आशा होती की, ही कंपनी आपण खूप मोठी करु व त्यांची आणखी भरभराट होईल. परंतू जसं अपेक्षित होतं तसं काहीच घडलं नाही. या कंपनीच्या माध्यमातून बिग बींचे कोट्यावधी रुपये अक्षरश: पाण्यात गेले. त्यांची आर्थिक परिस्थिती फारच कठीण झाली होती. घरची अवस्था बिकट झाली होती.
याबद्दल बोलताना अभिषेक बच्चन म्हणाला होता की, ‘अशी वेळ आली जेव्हा वडिलांनी मला अभ्यास सोडून घरी यायला सांगितले होते. मी बोस्टन विद्यापीठात शिकत होतो, पण माझे वडील आर्थिक संकटात सापडले म्हणून मी बोस्टन सोडले होते. मी त्यांना मदत करायलाही पात्र नव्हतो पण, मी थोडासा प्रयत्न केला आणि कंपनीमध्ये प्रॉडक्शन बॉय म्हणून काम करण्यास सुरवात केली होती.’
अभिषेक पुढे म्हणाला की, ‘एका रात्री वडिलांनी मला जवळ बोलावले आणि सांगितले की, त्यांचे चित्रपट चालत नाहीत आणि व्यवसायही नीट सुरु नाही. काहीही व्यवस्थित होत नव्हतं. अशावेळी आपला हुकमी एक्का समजल्या जाणाऱ्या अभिनयावर लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आणि दुसर्या दिवशी सकाळी ते यश चोप्रांच्या घरी पोहोचले.’
अमिताभ बच्चन हे यश चोप्रा यांना म्हणाले, ‘माझ्याकडे काही काम नाही. आता कोणीही मला काम देत नाही. माझे चित्रपट चालत नाहीत, म्हणून मी तुम्हाला कामासाठी विचारण्यासाठी आलो आहे. कृपया मला एका चित्रपटात काम द्या.’
यावेळेस अमिताभ हे नायकाच्या भूमिकेत म्हातारे होऊ लागले होते आणि नव्या नायकांचा काळ आला होता. मात्र, यश चोप्रा हे अमिताभ यांच्यासाठी कसे माघार घेतील. बिग बींना लक्षात ठेवून त्यांनी ‘मोहब्बतें’ हा चित्रपट बनविला होता. या चित्रपटात बिग बीं व्यतिरिक्त शाहरुख खान, ऐश्वर्या राय, उदय चोपडा, शमिता शेट्टी, किम शर्मा यासारख्या अनेक कलाकारांनी महत्त्वपूर्ण भूमिका केल्या आहेत. हा चित्रपट पडद्यावर सुपरहिट ठरला आणि त्यानंतर, पुन्हा एकदा पडद्यावर अमिताभ यांना उत्तम भूमिका मिळायला सुरवात झाली.
चित्रपटांव्यतिरिक्त त्यांनी ‘कौन बनेगा करोडपती’ या दूरचित्रवाणीवरील कार्यक्रमाचे होस्ट करण्यास सहमती दर्शविली आणि त्यांच्या नशिबाने त्यांना साथ देत पुन्हा एकदा यश मिळवुन दिले. आयुष्याचा वाईट काळाला मागे ढकलत बीग बी बी यांनी परत कधीच मागे वळून बघितले नाही. लवकरच ते ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटात दिसणार आहे.