बॉलिवूडमधून एक वाईट बातमी समोर येत आहे. ‘कगार’ फेम प्रसिद्ध अभिनेते अमिताभ दयाल यांचे बुधवारी (०२ फेब्रुवारी) पहाटे ४.३० वाजता हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते ५१ वर्षांचे होते. विशेष म्हणजे, त्यांनी ‘महानायक’ अमिताभ बच्चन, संजय दत्त, जॉन अब्राहम यांसारख्या दिग्गज कलाकारांसोबत काम केले होते. त्यांच्या निधनामुळे सिनेसृष्टीवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
अमिताभ दयाल (Amitabh Dayal) यांच्या निधनाची पुष्टी त्यांची पत्नी (Amitabh Dayal Wife) मृणालिनी पाटील (Mrunalinni Patil) यांनी केली. माध्यमांशी बोलताना त्यांनी म्हटले की, “१७ जानेवारी रोजी त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याने मुंबईतील नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. नंतर तपासणीत ते कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समजले. उपचारानंतर शनिवारी ते कोरोनामुक्त झाले. मात्र, आज पुन्हा एकदा त्यांना हृदयविकाराचा झटका आला, त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला.”
विशेष म्हणजे, अमिताभ दयाल यांनी ‘विरुद्ध’ आणि ‘कगार’ सारख्या सिनेमांमध्ये काम करण्यासोबतच त्यांची पत्नी मृणालिनी पाटील दिग्दर्शित ‘धूम’, ‘रंगदारी’, ‘ये दिल्लगी’ यांसारख्या सिनेमांमध्येही काम केले होते.
हेही पाहा- ‘या’ Tollywood कलाकारांच्या अभिनयाला तोडच नाही, Bollywood मध्येही दाखवलाय जलवा
बिलासपूर, छत्तीसगडचे रहिवासी असलेल्या अमिताभ दयाल यांच्या पत्नी मृणालिनी पाटील यांनी माध्यमांना सांगितले की, “अमिताभ दयाल यांचे काही नातेवाईक छत्तीसगडहून येण्याची वाट पाहिली जात आहे, त्यानंतर आज त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जातील.”
सन २०००मध्ये अभिनेते अमिताभ दयाल यांनी मराठी दिग्दर्शिका मृणालिनी पाटील यांच्यासोबत सात फेरे घेतले होते. मात्र, हे जोडपे लग्नाच्या ९ वर्षानंतरच वेगळे झाले. या दांपत्याला शिवम पाटील आणि अमृता पाटील अशी दोन मुले आहेत.










