Wednesday, July 3, 2024

जगात भारी! गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आहे ‘या’ बॉलिवूड कलाकारांची नोंद; वाचा काय केलाय कारनामा?

भारतीय सिनेसृष्टी ही जगातली सर्वात मोठ्या चित्रपटसृष्टींपैकी एक म्हणून ओळखली जाते. दरवर्षी जवळपास १२०० पेक्षा अधिक सिनेमे भारतात तयार होतात. भारतामध्ये सिनेमांचे लोकांना प्रचंड मोठ्या प्रमाणावर वेड आहे. चित्रपटांसोबतच कलाकारांना देखील आपल्या देशात मोठे स्थान असते.

कलाकारांना फॉलो करणाऱ्या लोकांची संख्या सुद्धा खूप आहे. कलाकार त्यांचे वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्य, ही स्वप्ननगरी सारखी वाटणारी सिनेसृष्टी आदी अनेक गोष्टी प्रेक्षकांना भुरळ घालण्यासाठी पुरेशा आहेत.

आपल्याकडे काही भागात, तर कलाकारांना थेट देवाचा दर्जा दिला गेला आहे. यात अनेक कलाकारांची नावे आहेत. कलाकारांना त्यांच्या अभिनयासाठी अनेक मोठमोठ्या पुरस्कारांनी देखील सन्मानित करण्यात येते. अशा या कलाकारांसाठी सर्वात मोठी कामगिरी म्हणजे या कलाकारांची नावे गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये येणे.

हो आपल्या या इंडस्ट्रीमधील अनेक कलाकार असे आहेत, ज्यांच्या विलक्षण कामगिरीमुळे त्यांच्या नावाची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये करण्यात आली आहे. चला तर जाणून घेऊया अशाच कलाकारांची नावे.

अमिताभ बच्चन
महानायक अमिताभ बच्चन हे त्यांच्या जिवंत अभिनयाने मागील अनेक दशकांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहेत. अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या आवाजात हनुमान चालीसा गायला असून, हनुमान चालीसा गाणारे ते पहिलेच कलाकार ठरले आहे. शेखर रावजियानी यांनी संगीत दिलेले हनुमान चालीसा अमिताभ यांनी १३ गायकांसोबत गायले होते.

शाहरुख खान
बॉलीवूडचा किंग खान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शाहरुखच्या नावावर देखील वर्ल्ड रेकॉर्ड आहे. २०१३ साली शाहरुखने जगात सर्वात जास्त कमाई केली होती. त्यावर्षी त्याने जवळपास २२० कोटी रुपये कमावले होते.

अभिषेक बच्चन
वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत अभिषेकने देखील त्याच्या नावावर वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे. अभिषेकने त्याच्या दिल्ली ६ सिनेमाच्या प्रमोशनसाठी १२ तासात १८०० किलोमीटरचा प्रवास केला. शिवाय १२ तासात अनेक शहरांमध्ये सार्वजनिक कार्यक्रमांना उपस्थिती लावण्याचा रेकॉर्ड अभिषेकच्या नावावर आहे.

कॅटरिना कैफ
बॉलिवूडची बार्बी डॉल म्हणून ओळखली जाणाऱ्या कॅटरिनाच्या नावे २०१३ साली सर्वात जास्त मानधन घेण्याचा वर्ल्ड रेकॉर्ड आहे. त्यावर्षी कॅटरिनाने एका सिनेमासाठी १० मिलियनपेक्षा अधिक मानधन घेतले होते.

कुमार सानू
प्रसिद्ध आणि लोकप्रिय गायक म्हणून ओळखले जाणाऱ्या सानूदा यांचे नाव देखील वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवण्यात आले आहे. १९९३ साली एकाच दिवसात २८ गाणे गाण्याचा विक्रम सानूदा यांच्या नावावर आहे.

आशा भोसले
आशा भोसले यांच्या नावावर २० पेक्षा अधिक भाषांमध्ये सुमारे ११ हजार गाणी गाण्याचा वर्ल्ड रेकॉर्ड आहे.

ललिता पवार
वयाच्या १७ व्या वर्षांपासून ललिता पवार यांनी या क्षेत्रात काम करायला सुरुवात केली. त्यांनी ७०० पेक्षा अधिक चित्रपटांमध्ये काम केले. वयाची ७० वर्ष त्यांनी या इंडस्ट्रीला दिली आहेत. यासाठीच ललिता यांचे नाव देखील गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवण्यात आले आहे.

जगदीश राज
जगदीश राज यांनी १४४ पेक्षा अधिक चित्रपटांमध्ये पोलीस निरीक्षकांची भूमिका निभावली आहे. या कारणामुळे त्यांचे नाव वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवले गेले आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हे देखील वाचा