Saturday, July 6, 2024

‘ते’ वादग्रस्त वक्तव्य भोवले, धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी बॉलिवूड अभिनेता राणा जंग बहादुरला अटक

‘काली’च्या पोस्टरवरून झालेल्या गदारोळात, दिग्दर्शिका लीना मणिमेकलाई यांच्या विरोधात भारतात तीन ठिकाणी एफआयआर दाखल करण्यात आला आहे, आता बॉलिवूड आणि पंजाबी चित्रपट अभिनेता राणा जंग बहादूरला जालंधर पोलिसांनी धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी अटक केली आहे. रिपोर्ट्सनुसार, राणा जंग बहादूर यांनी त्यांच्या एका मुलाखतीत वाल्मिकी भगवान यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केले आहे. अभिनेत्याने माफीही मागितली असली तरी विरोध पाहता अखेर पोलिसांनी अभिनेत्याला अटक केली आहे. 

‘हिंदुस्तान टाईम्स’च्या वृत्तानुसार, एक दिवस आधी जालंधर कोर्टाने राणा जंग बहादूरचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता, त्यानंतर त्याला गुरुवारी अटक करण्यात आली. राणा जंग बहादूर यांच्या वक्तव्यावर जालंधरमध्ये काही लोकांनी निदर्शनेही केली आहेत. या निदर्शनात मुळात वाल्मिकी समाजाचे लोक सहभागी झाले होते. राणा जंगबहादूर यांना अटक न केल्यास ११ जुलैला भारत बंद करू, असा इशारा आंदोलकांनी दिला होता. जालंधर येथील भगवान वाल्मिकी चौकात वाल्मिकी समाजाच्या सदस्यांनी धरणे आंदोलन केले. याशिवाय बसस्थानकाजवळ राणा जंगबहादूर यांच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले. होशियारपूर आणि अमृतसरमध्येही अशीच निदर्शने झाली.

जालंधरचे पोलीस उपायुक्त (डीसीपी) जसकिरणजीत सिंग तेजा यांनी सांगितले की, राणा जंग बहादूर यांना भारतीय दंड संहितेच्या (आयपीसी) कलम २९५ अंतर्गत अटक करण्यात आली आहे, जी धार्मिक भावना दुखावल्याचा आहे. यासोबतच त्यांच्यावर अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याची इतर कलमेही लावण्यात आली आहेत.

‘ट्रिब्यून इंडिया’च्या वृत्तानुसार, शहरातील न्यू बारादरी पोलिस ठाण्यात अभिनेत्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, अभिनेत्याने हात जोडून माफी मागितली होती. माफी मागताना राणा जंग बहादूर म्हणाले, ‘माझ्या वक्तव्यामुळे ज्यांना राग आला आहे, त्यांची मी मनापासून माफी मागू इच्छितो. समाज मोठा आहे, पण मी लहान आहे. मी कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंधित नाही. मी फक्त एक अभिनेता आहे. मला माफ करा”. सध्या या घटनेची सिने जगतात चांगलीच चर्चा रंगली आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हे देखील वाचा