राणी मुखर्जीच्या ‘मर्दानी’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारा अभिनेता ताहिर राज भसीन. ताहिर आज त्याचा ३४ वा वाढदिवस साजरा करत आहे. जाणून घेवूयात त्याचा जीवनप्रवास.
खरंतर ताहिरचे आजोबा एअर फोर्समध्ये फायटर पायलट होते. एअर फोर्सची पार्श्वभूमी असलेल्या परिवारात जन्म झाला असल्याने, ताहिरला देशातील अनेक भागांमध्ये जाऊन तेथील सगळ्या गोष्टी समजून घेण्याची संधी मिळाली. त्याचे शिक्षण ग्वालियर, जामनगर, विलिंग्टन, प्रयागराग, चंदिगढ आणि दिल्ली अश्या वेगवेगळ्या ठिकाणी झाले आहे.
शाळेत असल्यापासूनच ताहिरला अभिनयामध्ये खूपच आवड होती. त्यावेळी वयाच्या 15 व्या वर्षी त्याने दिल्लीमध्ये बॅरी जॉन यांच्या अभिनयाच्या शाळेत प्रशिक्षण घ्यायला सुरुवात केली. ताहिरचा जन्म २१ एप्रिल १९८७ मध्ये दिल्ली येथे झाला आहे.
ताहिरने ऑस्ट्रेलियामध्ये मीडियामधून त्याची मास्टर डिग्री पूर्ण केली आहे. त्यानंतरच २३ व्या वर्षी तो मुंबईत आला. अभिनयाचा ध्यास घेऊन तो मुंबईला आला होता. मुंबईला आल्यानंतर त्याने ४ शॉर्ट फिल्ममध्ये काम केले. तसेच अनेक जाहिराींमध्येही त्याने काम केले. 2012 मध्ये त्याने ‘किस्मत लव्ह पैसा दिल्ली’ आणि सुशांत सिंगचा ‘काइ पो चे’ आणि ‘वन बाय टू’ या चित्रपटात काम केले.
ताहिरने राणी मुखर्जीच्या ‘मर्दानी’ या चित्रपटात खलनायकाची भूमिका साकारली होती आणि तिथून खरी त्याला लोकप्रियता मिळाली. या चित्रपटातील दमदार अभिनयासाठी त्याला फिल्म फेअर अवॉर्डमध्ये सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता आणि स्क्रीन अवॉर्डने गौरवण्यात आले. त्यानंतर पुन्हा एकदा त्याला सुशांत सिंगसोबत ‘छिछोरे’ या चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली.
ताहिरच्या आगामी चित्रपटाबद्दल बोलायचे झाल्यास, तो कबीर खानच्या ‘८३’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात तो क्रिकेटर सुनील गावस्कर यांच्या भूमिकेत दिसणार आहे. भारतीय क्रिकेट संघाने १९८३ मध्ये वर्ल्ड कप जिंकला होता. या चित्रपटाची कहाणी या वर्ल्ड कपवर आधारित आहे. या चित्रपटात रणवीर सिंग मुख्य भूमिकेत दिसणार आहे.
ताहिर या दिवसात त्याची ‘ये काली काली आंखे’ या वेब सीरिजची लडाखमध्ये शूटिंग करत आहे. तसेच तो आगामी काळात अभिनेत्री तापसी पन्नु सोबत ‘लूप लपेट’ या चित्रपटात देखील दिसणार आहे.










