Wednesday, July 3, 2024

एका अभिनेत्रीच्या लग्नाच्या विरोधात उभा राहिला होता संपुर्ण समाज, तरीही प्रियकराशीच केले लग्न

बॉलिवूडमध्ये एक अभिनेता, निर्माता आणि गायक असे विविध पैलू असणारे खूप कमी कलाकार होते. ज्यांनी विविध गुणांनी बॉलिवूडमध्ये आपले एक वेगळेच स्थान निर्माण केले आहे. ३० ते ४० च्या दशकात जेव्हा अनेक अभिनेत्री प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत होत्या, त्यावेळी बॉलिवूडमध्ये एका अश्या अभिनेत्रीचा प्रवेश झाला, जी केवळ अभिनय नव्हे तर एक निर्माती आणि पार्श्वगायीका म्हणून प्रत्येकाचे मन जिंकत होती. आपण बोलत आहोत, बॉलिवूडमध्ये उत्तम कामगिरी केलेली अभिनेत्री कानन देवीबद्दल. आज कानन यांची जयंती आहे.

कानन देवी यांचा जन्म २२ एप्रिल १९१६ मध्ये ब्रिटिश बंगाल येथे हावडामधील एका सर्वसामान्य कुटुंबात झाला. त्या केवळ १० वर्षाच्या असताना तिच्या डोक्यावरील वडिलांचे छत्र हरपले. त्यानंतर कुटुंबाची आर्थिक परिस्थिती आणि येणाऱ्या काळातील त्यांची जबाबदारी बघता, त्यांनी आईला कामामध्ये मदत करण्यास सुरुवात केली. त्यावेळी एका कुटुंबातील मित्राकडून त्यांना ज्योती स्टुडिओ निर्मित ‘जयदेव’ या चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. त्यावेळी त्यांनी बाल कलाकार म्हणून काम केले होते.

त्यांनतर कानन न्यू थिएटरमध्ये काम करू लागल्या. त्यावेळी त्यांची भेट रायचंद बोराल यांच्यासोबत झाली. त्यांनी कानन देवी यांच्यासमोर हिंदी चित्रपटांमध्ये काम करण्याचा प्रस्ताव ठेवला. या काळात चित्रपटामध्ये काम करताना कोणत्याही कलाकाराला एका पार्श्वगायकाची भूमिका देखील निभावावी लागत होती. ही सगळी परिस्थिती लक्षात घेऊन त्यांनी गायनाचे प्रशिक्षक घेण्यास सुरुवात केली.त्यांनी भीष्मदेव चटर्जी यांच्याकडे गायनाचे प्रशिक्षण घेतले. यानंतर १९३७ मध्ये कानन यांनी ‘मुक्ती’ या चित्रपटात काम करून खर्या अर्थाने एक अभिनेत्री म्हणून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. हा चित्रपट त्याकाळचा सुपरहिट चित्रपट ठरला होता.

कानन यांनी १९४१ मध्ये न्यू थिएटरमध्ये काम सोडून दिले आणि स्वतंत्र काम करायला सुरुवात केली. यानंतर त्यांनी अनेक सुपरहिट चित्रपटामध्ये काम केले होते. त्यांनी ‘जवाब’, ‘हॉस्पिटल’, ‘वनफुल’, ‘राजलक्ष्मी’, ‘चंद्रशेखर’ यासारख्या चित्रपटात काम केले आहे.

कानन यांनी करिअरमध्ये जरी खूप नाव कमावले असले, तरी त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात त्यांना अनेक कठीण प्रसंगांना सामोरे जावे लागले होते. १९४० मध्ये कानन यांना ब्राह्मण समाजाच्या अशोक मॅत्रा यांच्यासोबत लग्न करायचे होते, त्यावेळी समाजाने त्याच्या लग्नाला नकार दर्शवला. कारण त्याकाळात महिलांनी चित्रपटात काम करणे चुकीचे आहे असे म्हंटले जात होते. तरी देखील त्यांनी समाजाच्या चौकटीच्या बाहेर जाऊन लग्न केले.

तेव्हा दिग्गज कवी गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांनी कानन यांच्या लग्नात भेट आणि त्यांना आशीर्वाद दिल्यामुळे समाजातील सगळेजण त्यांच्याशी योग्य वागत नव्हते. त्यांना दोषी ठरवत होते. लग्नानंतर त्यांचे नाते जास्त काळ टिकू शकले नाही आणि त्यांनी घटस्फोट घेतला.

त्यानंतर कानन यांनी १९४९ मध्ये हरिदास भट्टाचार्य यांच्यासोबत दुसरे लग्न केले. त्यांनी त्यांच्या करीअरमध्ये जवळपास ६० चित्रपटात काम केले आहे. चित्रपट सृष्टीतील त्यांची ही कामगिरी बघून त्यांना १९७६ मध्ये त्यांना ‘दादा साहेब फाळके’ या पुरस्काराने सन्मानित केले होते. तसेच १९६८ मध्ये त्यांना भारत सरकारने ‘पद्मश्री’ हा पुरस्कार दिला. आयुष्यात भरभरून यश मिळवलेल्या या अभिनेत्रीने १७ जुलै १९९२ मध्ये या जगाचा निरोप घेतला‌.

हे देखील वाचा